बाणकोट पुलाचे काम रखडल्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
बाणकोट पुलाचे काम मागील पाच ते सह वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्याचा विकास खुंटला असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्‍वरपासून दोन किलोमीटर पुढे बागमांडले गाव आहे. बागमांडले गावाजवळून बाणकोट खाडी जाते. तर, पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील व मंडणगड तालुक्यातील बाणकोट गाव आहे. बाणकोट गावाजवळ बावन्नकोट नावाचा एक किल्ला होता. परंतु, त्यानंतर त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन बाणकोट असे नाव पडले. याच बाणकोट खाडीवरून बागमांडले ते बाणकोट असा पूल उभा करण्यात येत होता. साधारण 2009 ते 10 साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. सुप्रीमो इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सदर पुलाचे कामाचा ठेका घेतलेला होता. हा पूल पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी व रायगड जिल्हा एकमेकाला रस्ते मार्गाने जोडले जाणार होते. तसेच सागरी महामार्गावर हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, मागील पाच ते सहा वर्षांपासून या पुलाचे काम पूर्ण पणे रखडलेले आहे. पुलाचे पिलर खाडी मध्ये उभे केलेले असून, त्या पुढे कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही.


या पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसून, ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. या विभागाचे कोणतेही कार्यालय श्रीवर्धन तालुक्यात नाही. त्यामुळे या पुलाबाबत कोणत्याही प्रकारची माहितीदेखील उपलब्ध होत नाही. सध्या त्याठिकाणी फेरी बोट सुरू असून, अनेकजण फेरी बोटीने येतात. तसेच श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना गणपतीपुळेकडे जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा झाला असता. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय मुंबई येथे असून, त्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही. तरी सदर विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाबाबत तातडीने निर्णय घेऊन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version