उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचा विश्वास
। रसायनी । वार्ताहर ।
आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी सप्तसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे आरोग्य संपन्न असेल तर आपण कुटुंब, समाज व पर्यायाने देश सेवा करू शकतो, त्यामुळे प्रत्यकाने आपल्या उत्तम आरोग्यासाठी कार्यरत राहून आरोग्य तपासणी करून घ्या,असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील चौक मंडळात ग्रुप ग्रामपंचायत कलोते हद्दीत विणेगाव आदिवासी वाडी येथे आदिवासी सप्तसूत्री व कातकरी उथ्थान कार्यक्रमांतर्ग आरोग्य शिबिराचे आयोजना बरोबर सप्तसूत्री कार्यक्रम करण्यात आला.त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अजित नैराळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार आयुब तांबोळी होते. सदर शिबिरामध्ये महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग, महिला व बाल संरक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांच्या संयुक्त विद्यमाने जातीच्या 71 प्रमाणपत्रे वाटप व 62 जातीच्या प्रमाण पत्रासाठी प्रकरणे तयार केली,शिधापत्रिकांचे अद्यावतीकरण करण्यासाठी अर्ज दाखल करून घेतले, संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र प्रकरणे तयार केली इत्यादींसह आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, यात 349 आदिवासी यांची आरोग्य तपासणी डॉ. किरण पवार यांच्या टीम ने तपासणी करून त्यांना औषधे दिली.ग्रामस्थांना कृषी विभाग व आदिवासी विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती तसेच बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली.
सदर शिबिरामध्ये आयुब तांबोळी तहसीलदार खालापूर यांनीही मार्गदर्शन केले. कमी वेळात अनेक जणांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणारे मंडळ अधिकारी किरण पाटील यांचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी मनापासून कौतुक केले. यावेळी आदिवासी महिलांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आभार व्यक्त करून आमचा वेळ,पैसा याची बचत होतेच पण शारीरिक मेहनत व रोजंदारी वाचते हे आवर्जून सांगितले.यावेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लागणार्या कागदपत्रांची छायांकित प्रत मोफत उपलब्ध करून दिली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसाद रोकडे, मंडल अधिकारी किरण पाटील, सरपंच रेश्मा पाटील, ग्रामविकास अधिकारी निलेश म्हसकर, तलाठी अमोल बोराटे, शिंदे, मुगदन, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, उपसरपंच गणेश धारपवार यांच्यासह महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग इ. विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.