शेकापक्षामुळेच वेश्‍वीचा विकास; आ. जयंत पाटील यांचा विश्‍वास

राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांचा प्रवेश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या झंजावातामुळेच वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत सर्वाधि विकासाची कामे झाली आहेत. मी माझ्या आमदारकीच्या 22 वर्षांच्या काळात सर्वाधिक निधी वेश्‍वी ग्रामपंचायतीला दिला आहे. या गावामध्ये आणि पंचायतीमध्ये सर्वांगिण विकास शेकापक्षानेच केला आहे. त्याचा दाम मागण्यासाठी आज मी जाहिररित्या तुमच्याकडे आलो असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.
वेश्‍वी ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ आणि राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांचा शेकापप्रवेश सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. योवळी माजी आमदार धैर्यशिल पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, विधानसभा मतदारसंघ चिटणीस संदीप घरत, तालुका चिटणीस अनिल पाटील, सरपंच पदाचे उमेदवार प्रफुल पाटील, माजी उपसरपंच नरेश पडियार, कामगार नेते सतीश लोंढे, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, अ‍ॅड परेश देशमुख, माजी उपसभापती मीनल अजित माळी आदी उपस्थित होते.
दत्ता ढवळे यांच्या सोबत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रसाद मगर, किरण गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या प्रिया ढवळे, राज ढवळे, हर्ष ढवळे आदींनी शेकापक्षात जाहिर प्रवेश केला. त्यांचे स्वागत आ. जयंत पाटील यांनी केले. यावेळी प्रफुल्ल पाटील यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ सदानंद शेळके, राघव गुरव, गजानन नाईक, गावकीचे अध्यक्ष सुभाष पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अरुण पाटील, महादेव जाधव, माजी सरपंच आरती पाटील, मृदूला मगर, जुई शेळके, शोभा भांगरे, भारती म्हात्रे यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, गोंधळपाडा म्हणून नरेश पडियारला उमेदवारी देत होतो मात्र त्यांना फक्त स्वतःलाच उमेदवारी हवी होती. त्यामुळे गोंधळपाड्यावर अन्याय झाला अशी खोटी आवई उठवणार्‍यांना ग्रामस्थच जागा दाखवतील. ग्रामपंचायतीमधील वाडगाव फाटयावर पाणी शेकापक्षाने आणून दिले. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम आपण केले. त्यामुळे जे काम केले त्याचा दाम हक्काने मागायला आलो आहे. पंचायतीत मी काम केले आहे, असा दावा त्यांनी केला. जे आता येतात आणि फेर्‍या मारतात त्यांनी दगड तरी टाकला आहे का पंचायतीत? सांगा मी सगळे उमेदवार मागे घेतो असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. आम्ही कधी खोटे बोलत नाही. जे करतो तेच बोलतो. हे आ. पाटील यांनी ठामपणे सांगितले. नरेश पडियार यांच्या पक्षनिष्ठेविषयी कौतुक करताना पडियार यांचा अभिमान वाटतो. पक्षातील कार्यकर्ता असावा तर पडियार सारखा. विरोधक बोलत असताना त्यांनी एकच सांगितले माझा नेता येईल तेंव्हाच मी बोलेन. पक्ष सांगेल त्या पद्धतीनेच काम करेन. आपण विदेशातून परत
आल्यानंतर सर्वात आधी गोंधळपाडयातील माझ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बोलावून सांगितले की जर बिनविरोध देणार असाल तर पडियारला उमेदवारी देतो. प्रफुल्लला उपसरपंच करतो. पडियार वेगळा आणि हा वेगळा असे नाही. मात्र त्यानंतर गोंधळपाड्यातील काहीजण आले त्यांनी गोंधळपाडयालाच सरपंच पद मिळाले पाहिजे अशी मागणी केली. त्यांना सांगितले की दिली उमेदवारी पण बिनविरोध करण्याची जबाबदारी तुमची. शेकापक्षातर्फे मी हमी दिली की पक्षातर्फे एकही फार्म भरणार नाही. मात्र कपट असणारे यावर तयार झाले नाहीत असेही ते म्हणाले.


राजकारणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, आज वेगळ्या टप्प्यावर राजकारण येऊन ठेपलेले आहे. आपण भरपूर कामे केली. पाण्यापासून लाईटपर्यंत सगळी कामे केली. प्रफुल्ल जास्त बोलतो एवढाच ठपका आहे पण सर्वात जास्त काम पण प्रफुल्लच करतो हे जनतेला कळले पाहिजे. वेश्‍वीमध्ये आणखी दोन तीन गोष्टी करण्याची इच्छा आहे. गोकुळेश्‍वरच्या तलावाचे सुशोभिकरण करणार आहोत. साडे सहा ते आठ कोटीचे इस्टिमेट तयार आहे. शिवाय मॉर्निंग वॉक ट्रॅक करायचे आहे. गोंधळपाड्यातील गोकूळेश्‍वर, शाहूनगरसह सर्व सोसायटयांच्या पाण्यासाठी दोन स्वतंत्र टाक्या करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
सरपंच पदाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्या कामाचा गौरव करताना गावात सर्वात जास्त काम प्रफुल्ल करतो. मयत झाल्यावर सर्व विधीसाठी खर्च करतो. एक वेगळे काम आणि सर्वांना एकोपा आणण्याचे काम प्रफुलनी केले आहे. मला प्रफुलचा अभिमान वाटत असल्याचे उद्गार देखील त्यांनी काढले.
या तालुक्यात जिल्ह्यात कार्यकर्ते घडवले ते शेकापक्षानेच. दुसर्‍या कोणाला कार्यकर्ते घडवता आले नाही. माळी समाज हॉल ग ची पाटील यांच्यामुळे उभे राहिले. त्यांचे काम अलिबाग तालुका कधीच विसरणार नाही. 15 वर्षापूर्वी विरोधक असलेले आज आशिर्वाद देतात याचा अभिमान वाटतो. आम्ही ज्यांना घडवले ते पद जाताच टाटा करतात. मात्र त्यांच्यामुळे खरे काम करणारे पुढे येतात. दत्ता ढवळे सारखे प्रामाणिक कार्यकर्ते पहायला मिळत नाही. अशा कायकर्त्यांच्या मागे खुर्ची धावते. ढवळे फार मोठे होणार आहेत
शेकापक्षाचा कार्यकर्ता पैशाने नाही तर कामाने मोठा आहे. वैचारिक बैठकीवर काम करणारा शेकापक्ष आहे. जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि ते काम पुर्ण केले नाही असे कधीच होणार नाही.
मराठा समाजाचे भवन हे वेश्‍वी किंवा अलिबाग तालुक्याचे नाही तर ते जिल्हयाचे आहे. त्यामुळे ते उभारण्याचे काम करणारच. ते होऊ नये म्हणून काहीजण प्रयत्न करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नाना भिक न घालता मराठा भवन उभारणारच मग त्यासाठी स्वतः जमीन देण्याची वेळ आली तर त्यासाठी ती पण देण्याची आपली तयारी असेल. त्याच प्रमाणे कुणबी भवन देखील उभारणार असल्याची ग्वाही यावेळी आ. जयंत पाटील यांनी दिली.
राजकारणात बदल होतो आहे. राजकारणात प्रामाणिकपणा, निष्ठा राहिली नाही. गद्दारीने राजकारण भरत चालले आहे. त्यामुळे आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. एक एक मत खणून काढायचे आहे. वेश्‍वीचा उमेदवार हा बेदाग आहे. पारदर्शक कारभार करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. जे खोटा प्रचार करतात त्यांना जनताच चोख उत्तर देईल असा विश्‍वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मौलिक काम करणार्‍यांची आठवण ठेवलीच पाहिजे असे सांगताना आज गांधी कोण होते हे सांगावे लागते याची खंत व्यक्त केली. ना ना पाटील यांचे काम स्मरणात राहण्यासाठी त्यांचा इतिहास नविन पिढीला कळला पाहिजे या दृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अलिबागमध्ये दत्ताजी खानविलकर यांचे योगदान आहे. मात्र आज त्यांना काँग्रेसवालेच विसरले आहेत. ना. का. भगत यांचा विसर पडला आहे. काँग्रेसचे मधूकर ठाकूर आमचे विरोधक होते पण ते प्रामाणिक होते. त्यांनी कधीच चुकीचे काम केले नाही. पण उद्या त्यांना पण लोकं विसरतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. या सार्‍या आमदारांमुळे अलिबागच्या आमदारकीची एक शान होती. ती आता जाते की काय याची भीती वाटत असल्याचे मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
वेश्‍वी आणि नवगावमध्ये आपला विजय शंभर टक्के आहे. सर्वाधिक मताधिक्याने इथला सरपंच निवडून येईल असा विश्‍वास व्यक्त करताना जि कामे राहिली असतील तरी पुर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रफुल्ल पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन संदीप जगे यांनी केले.
सभेपुर्वी आ. जयंत पाटील यांच्यासोबत कान्होजी आंग्रे पुतळ्याजवळून वाजत गाजत प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी वेश्‍वी आणि गोंधळपाड्यातील ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.

गोंधळपाडा आणि वेश्‍वीला सारखा निधी
गोंधळपाडा आणि वेश्‍वीला वेगळा न्याय कधीच दिला नाही. स्मशानभुमीसाठी गोंधळपाडासाठी आठ लाख दिले आणि वेश्‍वीसाठी पण आठ लाख रुपये दिले. मात्र आज वेश्‍वीची स्मशानभुमी पहा आणि गोंधळपाड्याची पहा. काम कोणाला दिली त्यामुळे फरक दिसतो आहे. माझा त्याला विरोध होता. हे चुकीचे होते आहे हे मी बजावले. क्वालीटी काम व्यवस्थित झाले पाहिजे. एक लाखाचे काम करायचे आणि पाच लाखाचे बिल काढायचे असे काम प्रफुल्ल ने कधी केले नाही. परिवर्तन, विकास कसला करणार? वेश्‍वीत विकास काम करायचे काय शिल्लक ठेवले आहे का शेकापक्षाने असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी केला. येथे पाणी, रस्ता, शाळा सगळे आहे. कुठले काम करायचे राहिले आहे. कसले परिवर्तन करायचे आहे? विकास होऊ नये म्हणून परिवर्तन करायचे आहे का ? खोटी बिले काढण्यासाठी परिवर्तन करणार? शेकापक्षाच मतदार ठाम आहे. तो कधी जातीवर मतदान करीत नाही असेही त्यांनी सांगितले.

सुरेश घरत यांना थळ मधून उमेदवारी
वरसोली येथील सुरेश घरत हा लढवय्या कार्यकर्ता आहे. पक्षासाठी सतत झटणार्‍या सुरेश घरत यांना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत थळ मधून उमेदवारी आपण देणार आहोत. त्यासाठी त्याची उमेदवारी आजच जाहिर करीत असल्याचे सांगून आ. जयंत पाटील यांची सुरेश घरत यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.

आजच्या प्रचारफेरीला आणि सभेला बाहेरचे लोक आणावे लागले नाहीत तर वेश्‍वी आणि गोंधळपाडयातीलच लोक आले आहेत असा टोला देत आपल्याला वेश्‍वी आणि गोंधळपाडा ग्रामस्थांचा अभिमान असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version