जलवाहतुकीतून विकासाला मिळणार दिशा

दिघी ते मुंबइ रो-रो प्रवास होणार सुरु, स्थानिक व पर्यटकांमध्ये आनंद

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुका पर्यटन दृष्टीकोणातून विकसित होत आहे. येथील दिघी-पुणे महामार्ग तसेच, प्रस्थापित रेवस-रेड्डी या समुद्रमार्गामुळे पर्यटनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिघी ते मुंबई ही रो-रो प्रवासी सेवा आता लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून देण्यात आली.

कोकणात जाणारे कोकणवासी तसेच, पर्यटकांना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दिघी ते मुंबई अशी बोटसेवा सुरू करण्यात येत आहे. मागील 2017 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली जलवाहतूक दहा दिवसांनी बंद करण्यात आली. समुद्रातुन होणार्‍या या प्रवासाला भाऊचा धक्का येथून सुरुवात झाली होती. त्यावेळी सुरू असलेल्या या प्रवासी वाहतूकीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रत्येकी 35 प्रवासी आसन क्षमता असलेल्या बोटीत दिघी-मुंबई प्रवासकरिता सरासरी वीस ते तीस प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांनी या प्रवासाचे स्वागत करत वाहतूक व प्रवास छान असल्याची प्रतिक्रिया दिली होती. याचाच विचार करत दिघी येथील जेटीचे काम गतिमान करण्यात येत आहे.

मेरिटाइम बोर्डच्या दिघी हद्दीत दोन जेटींची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील एक जेटीवरून दिघी आगरदांडा अशी फेरी बोट सुरू आहे. तर दुसर्‍या जेटीचे रो-रो बोट सेवेच्या अनुषंगाने कामकाज सुरू असून लवकरच येथून दिघीमार्गे मुंबई या जलवाहतुकीची सेवा प्रवाशांना मिळणार आहे.

मुंबई प्रवासासाठी उत्सुकता
पर्यटकांकडून वेळोवेळी विचारपूर्वक प्रवास करीत असताना कोणत्या मार्गाने प्रवास सुस्थितीत होईल व कोणत्या रस्त्यांनी कमी वेळात पोहचता येईल अशी विचारपुस प्रत्येकदा होतच असते. मात्र, आता दिघी बंदरातून लहान मोठ्या वाहनासहित 'रो-रो' मध्ये सुरु होणारी प्रवास सेवा आहे हे कळताच क्षणी प्रवासीवर्ग व पर्यटकांमध्ये प्रवास करण्याची उत्सुकता वाढेल.
लाखो पर्यटकांना फायदा
दिघी-आगरदांडा जंगल जेटीचा फायदा रायगड, रत्नागिरी जाणार्‍या लाखो पर्यटकांना होत आहे. त्याचबरोबर मुंबईतून जलवाहतुकीद्वारे अलिबागपर्यंत दर वर्षी येणार्‍या पर्यटकांपैकी निम्मे पर्यटक तरी आगरदांड्यातून श्रीवर्धन, म्हसळ्यापर्यंत वळले तरी त्याचा मोठा फायदा दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी होणार आहे.


नियमित सुरू असणार्‍या या मुंबई-मांडवा बोटीला दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालवण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. दिघी येथील जेटीचे रो-रो सेवा संबंधित कामकाज प्रगती पथावर आहे. त्यामुळे मुंबई ते दिघी ही जलवाहतूक प्रवासी सेवा पुन्हा लवकरच सुरू करण्यात येईल. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर ही जलवाहतूक सुरळीत सुरू राहील.

सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड.
Exit mobile version