शेकापक्षाच्या शब्दामुळे विकासकाम; आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

खंडाळे ग्रुप ग्रामपंचातीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापक्षाने शब्द दिला की रस्ता होतो. आणि काम होते ही आमची परंपरा आहे. मला माहिती नाही ऑर्डर बिर्डर, नाहीतर आम्ही स्वतः करतो. कुठलेही खोटे आश्‍वासन आम्ही देत नाही असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
तालुक्यातील खंडाळे ग्रुप ग्रामपंचातीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पंडित पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मिनल ठाकूर, सरपंच रंजना नाईक, उपसरपंच अशोक थळे, माजी पंचायत समिती सदस्य राजश्री गोंधळी, अजित माळी आदी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, खंडाळयाचे मतदार शेकापक्षाला मानणारे आहेत. ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे तसा होत नसल्याने आपण समाधानी नसल्याची खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जो अधिकार आपल्याला आहे तो अधिकार आपण राबविताना कमी पडत असल्याबाबतची नाराजी यावेळी त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अधिकाधिक विकास कामे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. शेकापक्षाने शब्द दिला की रस्ता होतो. आणि काम होते ही आमची परंपरा आहे. मला माहिती नाही ऑर्डर बिर्डर, नाहीतर आम्ही स्वतः करतो. कुठलेही खोटे आश्‍वासन आम्ही देत नाही. या गावामध्ये पाणी आणण्यासाठी लाखो, करोडो रुपये संपवले. पण पाणी काय आणू शकलो नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. वायशेत वरुन अलिबाग आणि चेंढरे साठी येणार्‍या अर्ध्या पाण्याची चोरी होत असल्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होते. आपला याला विरोध असून हा प्रकार थांबविण्यासाठी या मार्गाने येणार्‍या पाईप लाईनच्या ऐवजी जलपाडयावरुन पाईप लाईन आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. वडखळ अलिबाग चौपदरीकरणासाठी प्रयत्न करीत असून त्या रस्त्याच्या बोगद्यातून पाईप लाईन आणण्यासाठी पंडित पाटील यांनी प्रयत्न केले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये एमआयडीसीचे पाणी पोहचू शकत नाही. त्यावर मात करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे स्त्रोत शोधून त्याप्रमाणे नियोजन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विद्वान लोकं विधीमंडळात आता यायला लागले आहेत. विधीमंडळाचे कामकाज कळत नाहीत ते यायला लागले आहेत. कायदा कळत नाही या परिस्थिमुळे विधीमंडळाचे संख्याबळ एकप्रकारे कमी होऊ लागले असल्याचा टोला कोणाचेही नाव न घेता त्यांनी लगावला. पंचायत समिती हा तालुक्याचा आत्मा आहे. गोरगरीब जनतेच्या दैनंदिन योजना राबवायच्या आहेत त्या राबवायला आपण अपुरे पडले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पंडित पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, जी जी योजना शासनाने आणली ती प्रत्येक योजना खंडाळे ग्रामपंचायतीसाठी राबविण्याचा प्रयत्न आम्ही केला. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काम करणारा पक्ष आहे. खंडाळयाचा कांदा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कांद्यामध्ये इथल्या शेतकर्‍यांना फार मोठे प्राविण्य मिळविले आहे. आलेल्या योजना सभासदांना समजवून गावकर्‍यांपर्यंत पोहचवा जेणेकरुन निश्‍चितच गावाचा विकास होऊ शकेल. ग्रामपंचायत रोजगार हमी योजनेचे बरेचशे पैसे पडून आहेत. गावाचा मोठा विकास होऊ शकतो. सदस्यांना शासनाच्या योजना कळल्या पाहिजेत आणि त्या अधिक चांगल्या प्रकारे राबविता आल्या पाहिजेत. नवीन टिमने चांगले काम केले आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील म्हणाले की, शेकापच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्या जोरावर खंडाळे ग्रामपंचायतीत शेकापची सत्ता अबाधीत आहे. ग्रामपंचायतीच्या या नवीन इमारतीमधून कार्यालयाप्रमाणेच विकास कामे आधुनिक आणि अधिक चांगल्याप्रकारे व्हावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या समारंभात रायगड श्री प्रशांत कावजी, डॉक्टर विजय घरत, वैष्णवी पाटील, सैनिक समिर पाटील, माजी सैनिक अविनाश गोंधळी, उदय वेळे, मेघा पाटील, माधवी पाटील तसेच आदींचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच सुचिता कावजी, माजी उपसरपंच संतोष कनगुटकर, विनोट पाटील, नरेश गोंधळी, अनेश पाटील, अरुणा राऊत, समिक्षा पाटील, रजिता पाटील, वैदेही थळे, सानिया पाटील, अस्मिता नाईक, मंदा नाईक, विलास वालेकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन बबन पाटील यांनी केले.

खंडाळयासोबत शेकाप कटिबद्ध
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खंडाळे होणार असून. आर झोन होणार आहे. खंडाळा आणि शेतकरी कामगार पक्षाचे अतुट नाते आहे. अधिकाधिक विकास खंडाळयाचा करायचा आहे. पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून खंडाळयाचा आमच्यावर हक्क आहे. असे सांगतानाच आम्ही खंडाळयासोबत कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील यावेळी आ. जयंत पाटील यांनी दिली.

बिडीओंवर हक्कभंग आणणार!
खंडाळे ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाच्या शासकीय समारंभाला दांडी मारणार्‍या पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांबाबत आ. जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस बजावणार असल्याचा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला. पंचायत समितीच्या माध्यमातून होत असलेल्या या समारंभाला आपण आमदार म्हणून उपस्थित राहीलो आहोत. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, गटविकास अधिकारी उपस्थित राहत नाही. त्यावरुन लोकप्रतिनिधींचा वचक राहीला नसून तो वचक पुन्हा आपल्याला निर्माण करायचा आहे.

Exit mobile version