| महाड | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता आणि मानवमुक्तीच्या ऐतिहासिक लढ्याची साक्ष देणाऱ्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याची गुरुवारी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली. 20 मार्च 1927 रोजी झालेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला 2027 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील विकासकामे, नियोजन आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला.
चवदार तळे हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून सामाजिक समता, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि मानवमुक्तीच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे. त्यामुळे आगामी शताब्दी वर्षानिमित्त येथे होणारा सोहळा भव्य आणि ऐतिहासिक ठरावा, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले. चवदार तळे परिसरातील प्रलंबित व आवश्यक कामांना गती देण्यावर भर देण्यात येणार असून, नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, परिसर सुशोभीकरण, स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळे सत्याग्रहाने सामाजिक समतेच्या लढ्याला ऐतिहासिक दिशा दिली. त्यामुळे 2027 हे शताब्दी वर्ष या ऐतिहासिक वारशाला अधिक भव्य स्वरूप देणारे ठरावे, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
