। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत वऱ्हाड–जांभूळपाडा येथे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मुख्य घटक आठकावर प्रभावीपणे काम सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा आणि मूलभूत सुविधांवर भर देत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत.
या अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ग्रामपंचायत वेबसाईटची उभारणी, स्मशानभूमीमध्ये सर्व आवश्यक सुविधा, तसेच धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. यासोबतच ग्रामस्थांसाठी आयुष्यमान भारत कार्ड शिबिरांचे आयोजन, वनराई बंधाऱ्यांची उभारणी, स्वच्छता अभियान, तसेच ग्रामपंचायतीमार्फत सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देणे यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबविण्यात येत असून, त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळत आहे. या सर्व विकासकामांसाठी सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी सचिन बालाजी केंद्रे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे वऱ्हाड–जांभूळपाडा ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वांगीण विकास होत असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.






