वाहतूक कोंडीचा तिढा सुटेना
| पाली/बेणसे | वार्ताहर |
शनिवार ते सोमवार अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी झाली आहे. शिवाय पालीतून अन्य पर्यटक देखील दक्षिण रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग तसेच मुंबई, पुण्याकडेे जात आहेत. परिणामी पर्यटक व भाविकांच्या गाड्यांमुळे शनिवारी आणि रविवारी पालीत वाहतुक कोंडी झाली. पाली पोलिस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांची दमछाक होत आहे.
पालीतील वकील स्वराज मोरे यांनी सांगितले की, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नगरपंचायत प्रशासन व पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात यावी. नगरपंचायतीमार्फत काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र त्याने काहीही फायदा झालेला दिसत नाही. शिवाय रस्ते खराब असल्याने धुरळ्याचा प्रचंड त्रास होत असून नागरिक बेजार झाले आहेत.
यामुळे वाहतूक कोंडी
सलग सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहेत. शिवाय येथील अरुंद रस्ते, नो एन्ट्रीमधुन जाणारी वाहने, मोठ्या व अवजड वाहनांची रेलचेल, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक आदी कारणांमुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. अरुंद रस्त्यांमुळे दोन्ही बाजुने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूक कोंडी होते. मंदिर परिसरात देखिल अवैध्यरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत असून त्याचा त्रास स्थानिकांना देखील होत आहे.
पालीतील काही ठिकाणचे अनधिकृत बांधकाम हटवले आहे. रस्ते रुंद केले आहेत. पालीत येणारे व जाणारे रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.
प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली







