। ठाणे । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या कामात महापालिका कर्मचारी गुंतल्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला होता. आचारसंहिता संपताच कर्मचारी पुन्हा एकदा कामाला लागले असून दहा लाखापेक्षा जास्त थकबाकी असणार्या सुमारे पावणे दोनशे थकबाकीदारांना नोटीस पाठवून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच, मालमत्ता कर विभागाने 500 कोटी वसुलीचा टप्पा देखील पार केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात 6 लाख 15 हजार मालमत्ता ग्राहक असून या सर्वांना मालमत्ताकराची देयके पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी 10 लाखापेक्षा जास्त कर असलेल्या 179 मालमत्ता ग्राहकांना थकबाकीच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या ग्राहकांनी वेळेवर करभरणा करावा, यासाठी त्यांच्या मोबाईलवर एसएमएस देखील पाठवण्यात आले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी वेळेवर करभरणा केला नाही तर त्यांना दंड आकारून त्यांच्या घरातील मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे या विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले आहे. करभरणा करणार्या नागरिकांना ऑनलाईन कर भरता येणार आहे. तसेच, सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.







