धम्मक्रांतीमुळे सामाजिक परिवर्तनाला गती

। चिपळूण । वार्ताहर ।

बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर केलेली धम्मक्रांती ही जगातील एक अद्भुत क्रांती आहे. या क्रांतीमुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाला प्रचंड गती मिळाली व मूकनायकांचा आवाज बुलंद झाला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी येथे केले. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण स्थानिक व मुंबई यांच्यावतीने संस्थेच्या चिपळूण येथील विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन झाला. डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतर का केले? या धर्मांतरचे महत्व काय आहे, हे नव्या पिढीने समजून घेण्याची गरज आहे. 60-70 वर्षांपूर्वीचा काळ किती भयानक होता याची जाणीव नव्या पिढीला करून दिल्यावरच डॉ. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे महत्व आपल्या लक्षात येईल. बुद्धांच्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत बुद्ध धम्माची कशा पद्धतीने वाटचाल राहिली, बुद्ध धम्माला राजाश्रय कसा मिळाला. याबाबत प्रा. कदम यांनी माहिती दिली. संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणविचारांचा मागोवा घेतला. या वेळी धम्म ध्वजारोहण धम्म कमिटीचे अध्यक्ष मनोहर कदम, माजी गटविकास अधिकारी अरूण जाधव, उपाध्यक्ष नाना सावंत, बुद्धभूषण गमरे, सरचिटणीस संदेश पवार, सहचिटणीस तुकाराम सकपाळ, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते. विद्यार्थिनी दिक्षा मोहिते हिने मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या कथालेखन स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावून रौप्य पदक मिळवले. त्याबद्दल तिचा संस्थेच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

Exit mobile version