| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिनी गौरव निवडणूक कामातील योगदानाची दखल घेत कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रीय मतदार दिनी गौरविण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना ‘उत्कृष्ट साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सन 2025 या वर्षभरात मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदारांच्या तक्रारींचे जलद निवारण आणि निवडणूक प्रक्रियेत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी. तहसीलदार जाधव यांची निवड करण्यात आली. विशेषत युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या पुरस्काराबद्दल तहसीलदार धनंजय जाधव यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांनी या यशाचे श्रेय आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाला दिले असून, भविष्यातही अशाच निष्ठेने कार्य करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
धनंजय जाधव यांना पुरस्कार
