शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देणार- धनगावकर

| वावोशी | वार्ताहर |

जोपर्यंत रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आमची चळवळ ही पक्षाच्या माध्यमातून सुरूच राहील, असे प्रतिपादन रिपाईचे खालापूर तालुकाध्यक्ष महेंद्र धनगावकर यांनी केले. खालापूर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक रिपाईचे खालापूर तालुकाध्यक्ष महेंद्र धनगावकर यांच्या अध्यक्षतेखाली धामणी येथील सामाजिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी रिपाईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची मोहीम राबविणे, तालुक्यातील विविध कंपनीमध्ये तेथील स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरभरती व उद्योग कसा प्राप्त होईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यामधील बौद्धवाड्यांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी आमदार व खासदार यांच्याशी संपर्क करण्याबाबत, 20 मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रह दिन या क्रांतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करण्याबाबत आणि आगामी काळात येणार्‍या जिल्हा परिषद, समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका काय असेल याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या बैठकीला रिपाईचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, उपाध्यक्ष चिंतामण सोनावणे, हरीश केदारी, तुळशीराम जाधव, पंकज सोनावणे, मिलिंद गायकवाड, संदीप गायकवाड, सूर्यकांत कांबळे, किशोर निकाळजे, सुनील सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रिपाईचे कुंभिवली विभागीय अध्यक्ष सनील गायकवाड, मोरबे विभागीय अध्यक्ष शैलेश धनगावकर, चौक शाखा अध्यक्ष नागेश बाविस्कर, संजय मनेर, संतोष गायकवाड, गणेश केदारी, किसन सोनावणे, जगदीश कांबळे, खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version