। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात रॅलीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत शनिवारी प्रचाराची सांगता केली. ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’, ‘लोकशाही विरुद्ध हुकूमशाही’ आणि संविधान वाचविण्यासाठीची लढाई आहे. पुणेकर जनता या लढाईत मला साथ देऊन विजयी करेल, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (दि.13) मतदान होत आहे. यामुळे प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाली. गेल्या 30 दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघात 37 पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभेच्या माध्यमातून धंगेकर यांनी अधिकाधिक मतदारांशी संवाद साधला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सहाही विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पक्षाकडून मतदारसंघनिहाय नेमण्यात आलेल्या निरीक्षकांसह माजी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विकास ठाकरे यांच्यासह शहर पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून धंगेकर यांनी मतदारांशी संपर्क साधला.
दरम्यान, धंगेकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे (उबाठा) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रचारप्रमुख मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, आप, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते. प्रचारासाठी नेत्यांच्या सभाप्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडीचे प्रदेश पातळीवरील नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर पुण्यात तळ ठोकून होते. पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे निरीक्षक रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांच्या सभेच्या माध्यमातून धंगेकर यांनी मतदारसंघ ढवळून काढला.