। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दसरा मेळावा जोरदार शक्तीप्रदर्शनानंतर पार पडल्यावर आता सार्यांच्याच नजरा शुक्रवारी (दि.7) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे लागले आहे. या सुनावणीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह ठाकरे की शिंदे गटाला मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यष्यबाण निशाणी हवी आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही सुरु आहे. न्यायालयानेही निवडणूक आयोगानेच याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारपर्यंत योग्य ती कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शिंदे, ठाकरे गटाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे.
आयोगाने मुळ चिन्ह गोठविले तर दोन्ही गटांना कोणते चिन्ह मिळणार याबाबतही उत्सुकता लागली आहे. बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्हाचं संकेत देण्यात आले आहेत.
शिंदे गटाची निशाणी तलवार असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी गदा हे चिन्ह असू शकते. बीकेसीमध्ये तलावारीचं पुजन करून दस-या मेळाव्याला सुरुवात केली तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतीर्थावर देखील शस्त्रपुजन करण्यात आले पण प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदेचा वारंवार उल्लेख करण्यात आला. एकनाथ शिंदे यांचा बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळाव्यात 51 फूट तलवार दिसली होती. तलवारीचं भलमोठं लॅान्चिंग करण्यात आलं. मंचाच्याखाली भलीमोठी 51 फूट लांब तलवारीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी 12 फुट लांब चांदीची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली. आता एवढ्या मोठ्या सोहळ्यात धनुष्यबाणाचं लॅाचिंग करता आलं असतं पण तसं न करता खास तलवारीवर लक्ष केंद्रीत कसं होईल यावर भर देण्यात आला.
आवाज कुणाचा
नेत्यांनी केलेल्या भाषणामध्ये सर्वाधिक आवाज हा मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे समर्थक असणार्या शिवसेनेच्या उपनेत्या असणार्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणादरम्यान होता. पेडणेकरांच्या भाषणाच्या वेळेस शिवाजी पार्कवरील आवाज हा 97 डेसिबल इतका होता. तसेच शिंदे समर्थक आमदार धौर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज 88.5 डेसिबलपर्यंत पोहचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा आवाज 81.7 ते 91.6 डेसिबल इतका होता. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा आवाज हा 68.6 ते 88.4 डेसिबलदरम्यान होता. ठाकरे समर्थक सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा आवाज 77.6 ते 93.1 डेसिबलदरम्यान नोंदवण्यात आला. 87.4 ते 96.6 डेसिबल इतका आवाज अंबादास दानवे यांच्या भाषणाच्या वेळेस नोंदवण्यात आला.