धरणे आंदोलकांची मुस्कटदाबी

उन्हापासून संरक्षणाकरिता उभारलेले छप्पर पालिकेकडून जप्त
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात आक्रमक झालेल्या पालिका हद्दीतील ग्रामस्थांकडून पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. पालिकेने या आंदोलनाला परवानगी नाकारली असूनदेखील शुक्रवार (ता.16) पासून सुरु असलेल्या या आंदोलनात सामील ग्रामस्थांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार सुरु असून, कडकडीत उन्हातदेखील शांततेत आंदोलन करणार्‍या आंदोलकांनी उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता उभारलेले छप्पर रात्री नऊनंतर पोलिसांच्या मदतीने जप्त करण्याचे काम पालिकेकडून करण्यात आले आहे.

पालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात पालिकेत समाविष्ट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांकडून मालमत्ता कराबाबत फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे. या मागणीकरिता आंदोलन करण्याचा इशारा देत पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुख्यालयासमोर जागा नसल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असून, परवानगी नाकारल्यानंतरही सुरु असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचा आणि आंदोलनकर्त्यांना त्रास देण्याचा प्रकार पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला आहे. नवी मुंबई 95 गावं नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती व संलग्न संस्थांसह ग्रामस्थांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा पाठिंबा आहे.

भाजप नेत्यांची कार्यकर्त्यांना ताकीद
मालमत्ता कराविरोधात सुरु असणार्‍या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये, अशी सक्त ताकीद भाजपा नेत्यांकडून देण्यात आल्याची माहिती नेत्यांच्या विरोधानंतरदेखील आंदोलनात सामील झालेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवली आहे. मालमत्ता कर कमी न झाल्यास याचा भुर्दंड आम्हाला भरावा लागणार आहे. आंदोलनात सामील होऊ नका सांगणारे भाजपा नेते मालमत्ता कर कमी न झाल्यास आम्हाला मालमत्ता कर भरणा करण्यासाठी मदत करणार आहेत का, असा सवालदेखील या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Exit mobile version