| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्वात सक्षम ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील धसवाडीमध्ये पिण्याचे पाणी येत नाही. वाडीमधील 15 घरांतील महिलांना डोंगर उतरून विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. तेथील नळपाणी योजना कधीच नादुरुस्त झाली असून, वाडीमध्ये उघडे पाईप आणि पाणी नसलेली टाकी अशी स्थिती तेथे आहे.
नेरळ माथेरान रस्त्यावर जुम्मापट्टी गावाच्या मागे धसवाडी ही आदिवासी समाजाची वस्ती आहे. त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी कुटुंबासाठी नळपाणी योजना नेरळ पाणी योजनेचा भाग म्हणून राबविली जात होती. मात्र, धसवाडीमध्ये नेरळ ग्रामपंचायतीचे पाणी मागील काही वर्षे आले नाही. त्यामुळे येथील आदिवासी तरुणांनी माथेरानचे डोंगरातील दगडात तयार होणारे पाणी पाईपलाईन टाकून वाडीपर्यंत आणले होते. मात्र, धसवाडीमधील धनगर वाडी वस्तीच्या पुढे पाणी जात नाही. त्याचवेळी नेरळ पाणी योजनेचे जलकुंभ धसवाडीमध्ये आहे. पण, त्या जलकुंभात पाणी पोहोचत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे धसवाडीमधील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. वाडीमध्ये पिण्याचे पाणी आणणार्या लोखंडी पाईपच्या जलवाहिन्या जमिनीत सडून गेल्या आहेत.
पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे म्हणून तेथे जलकुंभाच्या बाजूला जलशुद्धीकरण संच बसविला आहे. त्याचे कारण अद्याप तेथील ग्रामस्थांना समजू शकले नाही. कारण नेरळ ग्रामपंचायतीचे पाणी हे शुद्ध आणि फिल्टर होऊनच येत असते, त्यामुळे तेथे जलशुद्धीकरण संचावर करण्यात आलेला खर्च बिनकामी ठरला आहे. त्याचेवेळी नळपाणी योजनेचे पाणी येत नसल्याने जलशुद्धीकरण संचाची गरजच काय होती? हादेखील प्रश्न असून, शासनाने असा वायफळ खर्च करणार्या अधिकार्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. येथील आदिवासी पिण्याचे पाणी आणण्यासाठी साधारण 300 फूट खाली असलेल्या विहिरीवर पाणी भरून आणण्यासाठी जात असतात. तेथून डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे नेण्याचे काम हे येथील महिला करीत असून, संपूर्ण दिवस पाणी भरण्यावर जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने धसवाडीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.