म्हसळ्यात धाविरदेवाची यात्रा

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा आणि परिसरातील वाड्या-वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणार्‍या, सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणार्‍या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणार्‍या श्री. धाविरदेव महाराजांची यात्रा सोमवारी (दि.22) संपन्न होत आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी श्री धाविर मंदिराच्या भव्य प्रांगणात यात्रा भरली जाते. या दिवशी चांदीचे मुखवटे, वस्त्रालंकार घालून ग्रामदेवतेला सजविण्यात येते. दुपारपासूनच ग्रामदेवता, बापूजी, काळभैरव, काळेश्‍वरी, जोगेश्‍वरी, झोलाई या देवतानांही विशेष वस्त्रालंकाराने सजविण्यात येऊन चांदीचा मुखवटा वगैरे अलंकार परिधान करून प्रसन्न व आनंदी उत्साहात वतनदारांची स्थापना केली जाते. रात्री आठच्या सुमारास पालखीने बापूजींना वाद्य वाजंत्रीसह यात्रेच्या ठिकाणी मानाने आणले जाते.

यात्रेदिवशी संपुर्ण गावाभोवती वेश (शिव) बांधण्याची प्रथा असून गावात वाईट प्रवृत्ती, रोगराई, संकटे येऊ नये तसेच ग्रामस्थांना उत्साही ठेवण्यासाठी गावाची शिव बांधून ग्रामस्थ व गावातील इतर वतनदार यांच्यासह हरिजन समाजाचे मानकरी विशेष प्रार्थना करतात. श्री धाविरदेव मंदिर ते संपुर्ण शहरभर यात्रा भरविण्यात येऊन यात्रेचे वातावरण आनंदी व उत्साही ठेवण्यात येते. या ग्रामदेवतेच्या यात्रेचे इतके महत्व आहे की अगदी मुंबई, पुणे, ठाणे या भागात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे या दिवशी हजारोच्या संख्येने आवर्जून आपली उपस्थिती दर्शवितात.

Exit mobile version