| पनवेल | प्रतिनिधी ।
गणेशोत्सवाला अवघे तीन आठवडे शिल्लक असतानाच पनवेल शहरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. गणेश मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीच्या नियोजनाला वेग आला असून, ढोल-ताशा पथकांच्या तालमींनाही जोर आला आहे.
पनवेल शहरातील विविध परिसरांत तरुण-तरुणींचे गट दररोज ढोल-ताशांच्या तालावर सराव करताना दिसत आहेत. मोकळी मैदाने, उड्डाणपुलांखालील जागा तसेच परिसरातील उपलब्ध मैदानांमध्ये ढोल, ताशा आणि झांजांच्या तालमी सुरू आहेत. गणेशोत्सवातील आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी पथकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. यंदा काही मंडळांनी नवीन वाद्यसामग्रीही घेतली असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या तालासोबत विविध तालांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताल, लय, वेग आणि एकसंघ वादन यावर विशेष भर दिला जात आहे.
मिरवणुकांसाठी जोरदार तयारी
गणेश मंडळांकडून मिरवणुकीचे मार्ग, वाहनांची सजावट, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू झाले आहे. त्याचबरोबर ढोल-ताशा पथकांकडून अंतिम सादरीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी नियमित सराव केला जात आहे. गणेशोत्सवाला अजून तीन आठवडे बाकी असतानाच पनवेल शहरातील विविध भागांत ढोल-ताशांचा निनाद ऐकू येऊ लागल्याने शहरात उत्सवाची चाहूल लागली आहे.
