जलतरण स्पर्धेत ध्रुवी खाडे प्रथम

विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड


| माणगाव | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा आयोजित रायगड जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे नुकत्याच घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील माणगाव मुगवली येथील लीड स्कूल या शाळेची विद्यार्थिनी ध्रुवी राजेंद्र खाडे हिनेे 50 मी बटरफ्लाय या जलतरण प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. त्यामुळे तिची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तिच्या या यशाचे कौतुक नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, लीड स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी, जलतरण मार्गदर्शक दत्ता तरे, पालक राजेंद्र खाडे यांनी केले असून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्ह्यातील विविध शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ध्रुवी खाडे हिने 50 फ्री स्टाईल या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. यासाठी तिचे शाळेचे प्रशिक्षक शिक्षक मंदार चौलकर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर साई मँगो रिसोर्टचे मालक मंगेश निंबाळकर यांचे सहकार्य लाभले. तसेच सतत मुलांना जलतरण खेळाविषयी प्रोत्साहन देणारे सेवानिवृत्त तहसीलदार रावसाहेब निंबाळकर यांनी सतत मार्गदर्शन केले.

Exit mobile version