लिलावापूर्वीच आयपीएलच्या बाजारात धुरळा

फ्रँचायझी नवीन कर्णधार बनवण्याच्या विचारात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार असून अनेक आयपीएल फ्रँचायझी नवीन कर्णधार बनवण्याच्या विचारात आहेत. भारताला टी-20 विश्‍वचषक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा आणि या फॉरमॅटचा नवा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर नजर असणार आहे. मात्र, यावेळी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आयपीएल 2025 च्या आधी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता असे सांगण्यात येत आहे की मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल चषक जिंकणारा रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी फ्रेंचायझी सोडू शकतो. याचा परिणाम केवळ मुंबई इंडियन्सच नाही तर अनेक फ्रँचायझींवर होईल. तसेच, सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, हे पाऊल भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी उचलले असे मानले जात आहे. यावर्षी मुंबई इंडियन्सने रोहितला हटवून हार्दिकची कर्णधारपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली होती, तेव्हा या दोन खेळाडूंमधील संबंध बिघडले होते. तर, सूर्या रोहितच्या जवळचा मानला जातो. अशा परिस्थितीत मुंबईला आता टी-20 मध्ये भारताचा कर्णधार असलेल्या सूर्याला कोणत्याही किंमतीत कायम ठेवावे लागेल.
याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतवर फारसे खूश नसून त्याला कायम ठेवायचे की नाही, याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. पंतला सोडण्याचा विचारही या संघात सुरू आहे. मात्र, या संघाचा मार्गदर्शक आणि माजी कर्णधार सौरव गांगुली पंतला कर्णधारपदावर ठेवण्याच्या बाजूने आहे. जर दिल्ली आणि पंत यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला घेऊ शकते. तसेच, लखनौ आणि केएल राहुलचेही संबंध काही चांगले दिसत नाहीत. गेल्या आयपीएल हंगामात एका सामन्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार राहुल यांच्यात मैदानावर झालेल्या चर्चेचा व्हिडिओ खूप गाजला होता. राहुल कर्नाटकचा असून आरसीबी त्याच्यावर सट्टा लावू शकतो.

यावेळी आयपीएलपूर्वी मोठा लिलाव होणार असल्याने आणि बीसीसीआयने खेळाडूंना कायम ठेवण्याचे नियम अद्याप जारी केलेले नसल्यामुळे त्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल. कारण संघ त्यानुसार रणनीती बनवतील. एका परदेशी खेळाडूसह चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाल्यास तीन भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय मुंबईसाठी खूप कठीण जाणार आहे. या मेगा लिलावात पुढील पाच वर्षांसाठी सर्व संघ आपला संघ बांधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.

Exit mobile version