ठाणे | प्रतिनिधी |
दरवर्षी दिवाळीनंतर गोडं पदार्थे खाल्ल्यामुळे साखर वाढली अशी तक्रार करणारे नागरिक आता दिवाळी साजरी करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. कोरोना महामारीत मधुमेह व उच्च रक्तदाब हे दोन आरोग्याचे शत्रू सर्वसामान्य माणसांना कळून चुकले आहेत त्यामुळे या दोन शत्रूंपासून आपले कसे रक्षण होईल याकडे अनेक नागरिकांचा कल आहे. असे नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी निदर्शनास आणले आहे.
दिवाळीमध्ये मधुमेह असलेले रुग्ण व सामान्य नागरिकांकडून दिवाळीत गोड पदार्थ खाऊन आरोग्य कसे राखावे याबाबत विचारणा होत आहे अशा सर्वांनी नियमित रक्त शर्करा चेक करणे हे महत्वाचे आहे तसेच दिवाळीत तुम्ही घरात बनविलेले पदार्थ खा परंतु ज्यांना घरी पदार्थ बनविणे शक्य नाही त्यांनी कमी प्रमाणात मिठाई व इतर पदार्थ खावे. मधुमेह हा एक सर्वसामान्य आजार झाला असून त्याला न घाबरता सामोरे गेली पाहिजे. रोज एक तास चालणे, पोटाला हवे तेवढेच खाणे, नियमित मेडिटेशन करणे, राग न करणे व व्यसनांपासून दूर राहणे अशा साध्या बाबींचे पालन केल्यास आपण मधुमेहाला दूर ठेवू शकतो.
साखरेचा त्रास टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बदाम, अक्रोड, काजू खाण्यावर भर दिला पाहिजे,असेही सुचित करण्यात आले आहे. घरगुती मिठाईत वापरलेले तूप, नारळ, डाळी आणि शेंगदाणे ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करतात. आपल्यापैकी बर्याचजणांना याची माहिती नसते. या सर्व गोष्टी पदार्थांची चवही वाढवतात आणि साखरही नियंत्रणात ठेवतात. मधुमेह रुग्णांनी एकाचवेळी गोड पदार्थ खाऊ नये त्याऐवजी दिवसातून 3 ते 4 वेळा कमी प्रमाणात खावे. दारू व सिगारेटचे सेवन करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.