राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
। माणगाव । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे त्यामुळे जनतेच्या,कार्यकर्त्यांच्या मनात पक्षाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी राज्यभरात संवाद यात्रा सुरु केली असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (13 एप्रिल) माणगाव येथे केले. माणगाव गांधी मेमोरियल हॉल याठिकाणी संवाद राष्ट्रवादी परिवाराचा जनतेच्या हिताचा हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार दि.13 एप्रिल 2022 रोजी परिवार संवाद यात्रेचे आयोजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी ना.पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील माणगाव,रोहा,तळा, म्हसळा, श्रीवर्धन या पाचही तालुक्यांचा पक्ष वाढीच्या दृष्टीने आढावा घेतला. यावेळी खा.सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश युवती जिल्हाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश महिला सरचिटणीस दीपिका चिपळूणकर, प्रदेश महिला निरीक्षक रुपाली दाभणे यांच्यासह पक्षाचे नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी सुरुवातीला ना.आदिती तटकरे यांचे कौतुक केले. महाराष्ट्रामध्ये पक्ष सत्तेवर आल्यानंतर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत आणि आम्ही सरकार मध्ये आम्ही बसलेलो आहोत त्या सरकारकडून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही गेली काही महिनाभर फिरत होतो.आज अशी हि आमची परिवार संवाद यात्रा गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यापासून सुरु झालेली ती आज माणगाव तालुक्यात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सगळे अनेक वर्ष काम करणारे नेते,कार्यकर्ते आहात.तुमचं म्हणणं काय आहे? ते समजून घ्यावं यासाठी हि परिवार संवाद यात्रा असल्याचे सांगितले.
खा.तटकरे यांनीही आमचा जनतेशी संपर्क आहे.त्यातूनच मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.श्रीवर्धन मतदार संघात 347 मतदान केंद्रे असून प्रत्येक ठिकाणी बूथ कमिट्या स्थापन करणे आवश्यक असून त्यातून जनतेचे आणखी काही प्रश्न मार्गी लागतील असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री अदिती तटकरे यानी जी जी काही खाती आपल्याकडं उपलब्ध आहेत त्यातून जास्तीत जास्त आपण या मतदार संघात काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत.असे सांगितले.
राज ठाकरेंची उतारा सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात उत्तरसभा पार पडली. राज ठाकरे यांनी या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरेंनी यावेळी जयंत पाटील यांची नक्कल करत टीका केली. जयंत पाटील यांना जंत पाटील म्हटले. त्यावर आता जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंची कालची सभा ही उतारा सभा होती. तसेच राज ठाकरे बालमोहन विद्यामंदिरचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांचं मराठी व्याकरण पक्क आहे. तरी देखील बालमोहनच्या विद्यार्थीने अशी चूक केली असल्यामुळे राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकविण्याची गरज आहे. अशी खरमरीत टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.






