कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 33;

| नेरळ | प्रतिनिधी |

मोठ्या गाजावाजात आमदार महेंद्र थोरवेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्घाटन झालेले कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर अजूनही रुग्णांसाठी बंदच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टेक्निशियन नियुक्ती व औषधसाठ्याअभावी हे केंद्र सुरूच झाले नसल्याने रुग्णांना खासगी व बाहेरील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

कर्जत तालुक्यातील डायलेसिस रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार असे मानले गेलेले कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर प्रत्यक्षात मात्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. 7 एप्रिल रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही पंधरवडा उलटला, तरी एकाही रुग्णाला येथे डायलेसिस सेवा मिळालेली नाही. कर्जत तालुक्यातील अनेक रुग्णांना सध्या रायगड हॉस्पिटल, पनवेल-नवी मुंबई येथील केंद्रे किंवा खासगी ट्रस्टमार्फत चालविलेल्या डायलेसिस सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात मोफत सेवा उपलब्ध होणार या अपेक्षेने रुग्णांना दिलासा मिळाला होता, मात्र प्रत्यक्षात केंद्र बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.वडवली येथील एक रुग्ण सध्या रायगड हॉस्पिटलमध्ये डायलेसिस करून घेत असून, खासगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयात ही सेवा मिळणार असल्याने आर्थिक समस्या सुटेल, असे त्यांना वाटले होते. परंतु, एक पंधरवडा गेला असून, अद्याप हे डायलेसिस सेंटर सुरू झालेले नाही.

दरम्यान, नेरळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष गणेश खराटे हे आपल्या नातेवाईकाला डायलेसिससाठी घेऊन गेले असता सेंटरला कुलूप असल्याचे आढळले. चौकशीत हे केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याचे स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे, 7 एप्रिलपासून आतापर्यंत केवळ चार रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एक ग्रामीण रुग्णालय असूनही संभाव्य रुग्णांची यादी संकलित करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे “हे डायलेसिस सेंटर केवळ दिखावा आहे का?” असा सवाल उपस्थित होत असून, रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कर्जत तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, एक ग्रामीण रुग्णालय आहे आणि या सर्व भागातून किमान काही शे रुग्णांना डायलेसिस घ्यावे लागते. ही बाब लक्षात घेता कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून अद्याप एकही प्राथमिक आरोग्य केंद्राला त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्र भागातील डायलेसिस घेणाऱ्या रुग्णांची नावे संकलित करण्यास सांगितले नाही किंवा तसा पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे कर्जत शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेले डायलेसिस सेंटर हे केवळ दिखाऊपणा आहे काय? असा प्रश्न गणेश खराटे यांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणावरून रुग्णांना सेवा मिळावी यासाठी आमदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

डायलेसिस सेंटरसाठी आवश्यक टेक्निशियन नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा रुग्णालयाकडून आदेश मिळाल्यानंतर लवकरच केंद्र सुरू होईल. सध्या औषधसाठाही उपलब्ध नाही. रुग्णांना तातडीची सेवा देण्याऐवजी उद्घाटनापुरतेच मर्यादित राहिलेल्या या प्रकल्पाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

– डॉ. मस्कर, वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उपजिल्हा रुग्णालय

Exit mobile version