100 वर्षे जुनी स्मशानभूमी हलविण्याचा घाट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे बंडखोर आ. महेंद्र दळवी यांच्या वरदहस्तामुळे त्यांचे बगलबच्चे ग्रामस्थांना न जुमानता अवैध धंदे करीत असल्याचा आरोप सरपंच प्रशांत मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा तक्रारी करुनही प्रशासकीय यंत्रणादेखील आमदारांच्या विरोधात जाण्याचे धाडस करीत नसल्यामुळे ग्रामस्थदेखील हतबल झाले होते. अखेर अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविणार्या कृषीवलने त्यांची व्यथा जाणून घेतली. कृषीवलच्या टीमने ग्रामस्थांसोबत चर्चा केली असता ग्रामस्थांनी आमदारांच्या वरदहस्ताने बगलबच्चांनी केलेल्या अनेक अवैध कामांचा पाढाच वाचून दाखविला. सरपंच प्रशांत मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांनी पुराव्यासहित आमदारांनी केलेली मुस्कटदाबी बिनधास्तपणे सांगितली. त्यामुळे कोर्लई गावात आमदारांच्या पाठिंब्याने होत असलेल्या अनेक गैरकामांवर प्रकाश टाकण्याचे काम कृषीवल करीत आहे.
अवैध कामांनाच पाठिंबा देत माया गोळा करणारे अलिबागचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात सुरुवातीपासूनच अलिबाग-मुरुड तालुक्यात असंतोषाचे वातावरण आहे. खोटारडेपणा हाच पाया असलेल्या आमदाराने शिवसेनेत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुखावत आपला स्वार्थच साधण्याचा प्रयत्न केला होता. राज्याच्या राजकारणात बंडखोरीचा भूकंप घडल्यानंतर शिंदे गटाला आमदार दळवी यांनी साथ दिल्यानंतर त्यांनी केलेले अनेक गैरकारभार हळूहळू बाहेर पडू लागले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, निष्ठावंत शिवसैनिक असलेले प्रशांत मिसाळ हे मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. त्यांच्याशी कृषीवलच्या टीमने संपर्क साधला असता प्रशांत मिसाळ यांनी आमदारांच्या पापांचा पाढाच वाचला.
गावात शंभर वर्ष जुनी असलेली स्मशानभूमी केवळ धनदांडग्यांच्या मालमत्तेच्या आड येत असल्याने दुसर्या ठिकाणी उभारण्याचे काम त्यांनी केले. ग्रामस्थांचा आणि आगरी समाजाचा प्रचंड विरोध असताना सत्तेची मस्ती असल्याने शासकीय यंत्रणेवर दबाव आणून स्मशानभूमी हलविण्याचा घाट घातला. त्यासाठी कसलीही परवानगी न घेता आमदारांनी आपल्या समर्थकाद्वारे दुसरीकडे स्मशानभूमीचे काम देखील सुरु केले. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने त्याला विरोध केल्यानंतर हे काम थांबविले. मात्र या विरोधाला न जुमानता सदर व्यक्तीने पुढे काम केले. याबाबत अनेक तक्रारी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात सरपंचासह ग्रामस्थ तसेच आगरी समाजाची संतप्त भूमिका असून, वेळप्रसंगी आंदोलन करण्याची तयारी असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
कोर्लई येथील स्मशानभूमीबाबत जानेवारीमध्ये ग्रामस्थांनी केलेल्या विरोधानंतर सदरचे बांधकाम तत्कालिन तहसिलदारांनी थांबविले होते. मात्र सध्या हे बांधकाम सुरु आहे की नाही याबाबत काही माहिती नाही. गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेण्यात येईल.
रोहन शिंदे, तहसिलदार, मुरुड