| मुंबई | प्रतिनिधी |
आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. भाजपाचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली. कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एक महिन्याचे धान्य शिल्लक होते. अस्वस्थ झालो होतो. जनतेला खायला नव्हते. शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे. मागील काळात शेतीसाठी दिंडी काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो? म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. मागील काळात 61 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केली. एका मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाल्यापासून शरद पवार सातत्याने भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. अनेक मुद्द्यांचा आधार घेत शरद पवार तोफ डागताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. अशातच पुन्हा एकदा शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला.
मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जनतेला आता लोकशाही हवी आहे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते भाजपाचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. देशात वेगळा विचार करण्याची गरज आहे. कधी राहुल गांधींवर टीका करतात. त्यांनी देशाच्या सगळ्या भागात जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेतले. त्यांच्यावर टिंगल केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षाची जबाबदारी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अगोदर तुम्ही काय केले ते सांगा मग इतरांवर टीका करा, या शब्दांत शरद पवारांनी भाजपाला सुनावले. दरम्यान, अनेक नेते होऊन गेले, त्यांनी राज्याचा आणि देशाचा विचार केला. आता मोदींच्या काळात काय सुरू आहे? अनेक लोकांना नोकरी नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केळीचे पीक नष्ट झाले, मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे, याचा अर्थ ही हुकूमशाही आहे. आमच्या आघाडीमध्ये ठाकरे असतील, काँग्रेस असतील, किंवा अन्य सगळ्यासाठी आम्ही आघाडी केली आहे. आता तुमची मदत हवी आहे, असे आवाहन शरद पवारांनी केले.