| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर डिझेल व तत्सम तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. मात्र, शासकीय यंत्रणेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे खुलेआम पणे किनाऱ्यावर हा व्यवसाय करणाऱ्या डिझेल माफियांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
उरण तालुका हे एक बेट असून सभोवताली खाडी पसरलेली आहे. तसेच, या ठिकाणी मोराजेट्टी व जवळपास जेएनपीए बंदर आहे. त्याचा फायदा किनाऱ्यावर डिझेल व तत्सम तेलाची तस्करी करणारे माफिया घेत असून त्यांनी मोरा परिसरात धुमाकूळ घातला आहे. उरण परिसरात मागील काही वर्षांपासून जेएनपीटी बंदरात येणाऱ्या परदेशी जहाजातील कर्मचाऱ्यांशी संधान बांधून समुद्रकिनाऱ्यापासून दूर अंतरावर उभ्या राहणाऱ्या या जहाजातील डिझेल छोट्या बोटीत उतरवून खाडी मार्गाने तस्करी करण्याचे काम जोरात सुरु आहे. सागरी पोलीस ठाणे तसेच तटरक्षक दल यांना या तस्करीची माहिती असून, त्यांच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत, असा आरोप स्थानिकांमधून होत आहे. तसेच, परदेशी जहाजातून जवळपास 30 रुपये लीटरने मिळणारे हे डिझेल बाजारपेठेत जादा दराने विक्री करून महसूल बुडवण्याचे काम हे तस्कर करत असल्याचे देखील स्थानिकांमधून बोलले जात आहे.
ही तस्करी सर्रास खाडीच्या परिसरातून सुरू आहे. गेल्या काही दिवसांत याचा जोर वाढला असून हे समुद्राचे बाहेरून येणाऱ्या बार्जेसच्या चालकांकडून हजारो लिटर डिझेल कमी भावात विकत घेतात आणि ते साठवून ठेवतात. सध्या डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, काळ्या बाजारातून गाडी व्यावसायिक डिझेल घेताना दिसत आहेत. उरणसह पनवेल, वडखळ, नागोठणे या भागातील ट्रान्सपोर्टचा धंदा करणारे या समुद्र चाच्यांशी संपर्क करून, डिझेल खरेदी करतात. त्यामुळे याकडे सागरी पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. तसेच, माफियांकडून तस्करी करण्यासाठी वापरला जाणार सुमद्रीमार्गाचा वापर भविष्यात अतिरेकी देखील करू शकतील. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.







