| उरण | वार्ताहर |
उरण परिसरातील समुद्र किनारी डिझेल व तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. शासकीय यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. तरी या माफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जेएनपीटी बंदरात येणाऱ्या परदेशी जहाजातील कर्मचाऱ्यांशी संधान बांधून समुद्र किनाऱ्यापासून दूर काही नॉटिकल मैल अंतरावर उभ्या राहणाऱ्या जहाजातील डिझेल छोट्या बोटीत उतरवून खाडी मार्गाने तस्करी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून जोरात सुरु आहे. पोलीस, तटरक्षक दल यांना या तस्करीची माहिती असून, त्यांच्या आशीर्वादानेच व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे. परदेशी जहाजातून जवळपास 30 रुपये लीटरने मिळणारे हे डिझेल बाजारपेठेत जादा दराने विक्री करून महसूल बुडवण्याचे काम हे तस्कर करतात, असे म्हटले जाते.
सध्या डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, काळ्या बाजारातून गाडी व्यावसायिक डिझेल घेताना दिसत आहेत. पोलीस ठाण्यांचे सागरी मार्गाकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे. कारण सर्रास खाडीच्या परिसरात डिझेलची तस्करी सुरू आहे. गेल्या 15 दिवसांत याचा ओघ वाढला आहे. हे समुद्रचाचे बाहेरून येणाऱ्या बार्जेसच्या चालकांकडून हजारो लिटर डिझेल घेत असतात आणि हे डिझेल साठवून ठेवतात. डिझेलच्या किंमती वाढल्याने मोठ्या प्रमाणात या डिझेललाही मागणी वाढते. तसेच, उरण, पनवेल, वडखळ, नागोठणे या भागातील ट्रान्सपोर्टचा धंदा करणऱ्या तस्करांशी संपर्क करून हे चाचे डिझेल खरेदी करत असतात.