डिझेल तस्करीचे धागेदोरे रायगडमधून

डिझेलसह 66 लाख रुपयांचा ऐवज जप्त

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात डिझेल तस्करीने धुमाकूळ घातल्याचे आता पुन्हा उघड झाले आहे. पोलिसांनी कारवाई करूनदेखील जिल्ह्यात हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. अलिबागमधून पनवेलकडे जाणाऱ्या टँकरवर नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेने नुकतीच कारवाई केली. त्यात 66 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 26 लाख रुपयांच्या डिझेलचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अलिबागहून एक बारा टायरचा टँकर पनवेलकडे येत असल्याची माहिती नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, पोलीस हवालदार अजय कदम, नितीन जगताप यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने रविवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर या पथकाने टँकर अडवला. चालकाची विचारपूस केल्यावर त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे दिसून आले नाही. बेकायदेशिररित्या डिझेलची तस्करी केल्याचे उघड झाले. राजमनी सरोज असे या चालकाचे नाव आहे. मालकाच्या सांगण्यावरून अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरातून टँकरद्वारे हे डिझेल छुप्या पध्दतीने वाहतूक केल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आणखी सहाजणांचा समावेश असून, त्यांचा तपास पथकामार्फत सुुरू केला आहे.

समुद्रातून डिझेल तस्करी करणाऱ्यांवर रायगड पोलिसांनी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कारवाई केली. या कारवाईमध्ये 25 लाख रुपयांच्या दोन बोटी, 6 लाख 67 हजार रुपये किंमतीचा 8 हजार 250 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. तरीदेखील जिल्ह्यात खुलेआमपणे रात्रीच्यावेळी हा धंदा सुरु असल्याचे उघड झाले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गेल्या अनेक दिवसांपासून साळाव पुलाच्या खाली रात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान डिझेल तस्करी होत असतानाही त्याकडे स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version