| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमध्ये महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनातून डिझेलचोरीचे अनेक प्रकार घडत असल्याने पोलीस डिझेल चोरांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने स्वतः वाहनचालक व मालकांनी कायदा हातात घेऊन स्वतः मारहाणीचे पाऊल उचलण्याच्या घटना घडत आहेत.
तळोजा येथे अशाच एका घटनेत एका निष्पाप फळविक्रेत्याला बेदम मारहाण झाली. ही घटना पहाटे सहा वाजता मुंब्रा पनवेल महामार्गावर घडली. मुंब्रा पनवेल महामार्गावरील तळोजा गावालगत नौमानी मशीदीजवळ मोठ्या प्रमाणात जड व अवजड वाहने उभी केली जातात. याच ठिकाणी कलिंगड खरेदीसाठी किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांकडे पहाटेच येतात. 34 वर्षीय बिलाल अब्दुल रौफ नम्रे हेसुद्धा तेथे कलिंगड खरेदीसाठी आले होते. मात्र, या ठिकाणी ट्रकचालक निरज यादव आणि त्याचा वाहनावरील मदतनीस मोहम्मद इजराईल हमीद हसन याने बिलाल यांच्या अंगावरील कपडे मळके असल्याने त्याला डिझेल चोर समजून मारहाण सुरू केली. त्यानंतर बिलाल याला या ट्रकमध्ये कोंडून कळंबोली येथील स्टील मार्केटमधील डिस्मा वजनकाटा या इमारतीजवळील एका झाडाला बांधून पुन्हा हाताबुक्क्याने व सळईने मारहाण केल्याचे बिलाल यांनी तळोजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची बातमी तळोजा पोलिसांना समजताच तातडीने काही मिनिटात पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार मोहिते यांच्यासर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी बिलाल याची ट्रकचालक यादव व त्याच्या साथीदाराच्या हातून सुटका केली. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी ट्रकचालक नीरज यादव आणि त्याचा मदतनीस मोहम्मद इजराईल हमीद हसन यांंच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते करीत आहेत.







