शिंदे सेनेतील मतभेद चव्हाट्यावर

। पुणे । प्रतिनिधी ।

पंतप्रधान नरेंद्र मोदींची दोनच दिवसांपूर्वी पुण्यात सभा झाली. महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्यानं निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेला महायुतीचे पुणे, शिरुर, बारामती आणि मावळचे उमेदवार उपस्थित होते. या सभेमुळे मोदींनी जिल्ह्यात महायुतीसाठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या भव्य सभेची चांगलीच चर्चा झाली. मात्र, आता महायुतीत असलेल्या शिंदेंच्या सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परवाच पुणे दौर्‍यावर होते. मोदींची सभा असल्याने शिंदे पुण्यात आले होते. त्यावेळी भानगिरेंनी मुख्यमंत्र्यांना घरी जेवणासाठी बोलावले होते. पण मुख्यमंत्री शिंदे नाना भानगिरे यांच्या घरी जेवणासाठी गेले नाहीत. त्यामुळे भानगिरे नाराज झाले. आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात आहे.

तसेच, नाना भानगिरे यांची नाराजी दिवसागणिक वाढत आहे. भानगिरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. पक्षात वारंवार डावललं जात असल्याची भावना भानगिरेंच्या मनात आहे. त्यामुळे ते लवकरच शिवसेनेला जय महाराष्ट्र करु शकतात.

Exit mobile version