‌‘दिघी क्वीन’चा डायलिसिस रुग्णांना दिलासा

उपचारासाठी जलवाहतूक प्रवास मोफत

| दिघी | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील डायलिसिस रुग्णांचे मुरुड तसेच मुंबईकडे नियमित उपचारासाठी जाणे-येणे असते. अशा गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींना येथील जंगल जेटी ‌‘दिघी क्वीन’ या प्रवासी बोटीतून प्रवास मोफत ठेवला आहे. दिघी जलवाहतूक व्यवस्थापकांच्या या सुविधेमुळे डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिघी बंदरातून मुरुड तालुका तसेच मुंबईकडे जाण्यासाठी जलवाहतूक करणाऱ्या दोन कंपनीच्या बोटी कार्यरत आहेत. त्यातील दिघी येथील स्थानिक संस्थेची ‌‘दिघी क्वीन’ नावाने दिघी ते आगरदांडा अशी रोरो प्रवासी वाहतूक सुरू आहे. या प्रवासादरम्यान आठवड्यातून तीनदा डायलिसिस करणाऱ्या आठ ते दहा रुग्णांची होणारी परवड दिसून आली. दिघी, बोर्लीपंचतन परिसरातील रुग्णांना जास्त करून उपचारासाठी मुरुड येथे आठवड्यातून दोन ते तीन वेळा जावे लागते. तासाभराच्या अंतरात दिघी व आगरदांडा या ठिकाणांहून जलवाहतूक होत असल्याने ही मोफत सेवा सोयीची ठरत असल्याचे रुग्ण सांगत आहे.

Exit mobile version