श्रीवर्धन येथील बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। दिघी । प्रतिनिधी ।
दिघी-बोर्लीपंचतन परिसरातील अनेक गावांना श्रीवर्धन तालुक्याला जाणार्या मुख्य रस्त्याची दुरुस्तीची मागणी मागील दोन महिने होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम आजही अर्धवट आहे. सद्यस्थितीत रस्त्याचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे. तालुक्यातील दिघी, सर्वे व बोर्लीपंचतन क्षेत्रातील चाळीसहून अधिक गावांचा प्रवास या मुख्य रस्त्यावर अगणित पडलेल्या खड्ड्यातून होत आहे. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी मागील दोन महिन्यापासून मागणी होत आहे. सध्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर टाकलेल्या खडीला सात दिवसांहुन अधिक कालावधी उलटला आहे. तरीही सुस्तावलेले सार्वजनिक बांधकाम खाते मात्र तत्काळ डांबरीकरण करण्याऐवजी कोणत्या मुहुर्ताची वाट पाहते? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दुरुस्तीच्या कामात दिरंगाई
रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात दिरंगाई झाल्याने सुरू झालेल्या पावसाने पूर्ण रस्ता चिखलात गेला आहे. संबंधित विभागाने वेळेत कामाची तसदी घेतली असती तर आमचा धोकादायक प्रवास टळला असता अशी प्रवाशी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया मिळत आहेत.







