30 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
| वावोशी | प्रतिनिधी |
टाटा स्टील फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी दोन दिवसीय डिजिटल लिटरसी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रशिक्षणात परिसरातील तब्बल 30 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डिजिटल साक्षरतेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाबाबत सक्षम बनवणे, शासकीय योजनांचा स्वतःहून लाभ घेता यावा, तसेच दैनंदिन जीवनात मोबाईलचा सुरक्षित व प्रभावी वापर करता यावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. टाटा स्टील फाउंडेशनच्या फिल्ड कोऑर्डिनेटर करूणा कदम यांनी प्रशिक्षणामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आज महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढत असताना डिजिटल व तांत्रिक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे. योग्य माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास महिलांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
यावेळी या प्रशिक्षणादरम्यान डिजिलॉकर, मेरा रेशन, ई-आधार, आयुष्यमान भारत योजना यांसह सायबर सुरक्षितता व मोबाईल सेफ्टीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चाटजिपिटी व जेमिनी यांसारख्या आधुनिक डिजिटल साधनांच्या सहाय्याने शासकीय अर्ज कसे लिहावेत याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यासोबतच स्त्रीपुरुष समानता या विषयावरही महिलांमध्ये जागृती करण्यात आली. प्रशिक्षक रंजना राणे यांनी प्रत्यक्ष महिलांच्या मोबाईलमध्ये आवश्यक ॲप्स डाउनलोड करून त्यांचा वापर कसा करायचा, हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. त्यामुळे महिलांना डिजिटल ॲप्स वापरण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला.
या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये डिजिटल आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे महिला अधिक सक्षम होतील असा विश्वास उपस्थित महिलांनी व्यक्त केला.







