कोकणनामा प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान

रायगड | प्रतिनिधी |

कोकणनामा प्रतिष्ठान, अलिबागतर्फे साहित्यिक-पत्रकार उमाजी केळुसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 2023 या वर्षासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र हॉटेल सम्राट पुरस्कार आणि कोकण भूषण पुरस्कार पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, 5 ऑगस्ट रोजी अलिबागेतील हॉटेल गुरुप्रसाद सभागृहात पार पडला.
याप्रसंगी महाराष्ट्र हॉटेल सम्राट या पुरस्काराने शून्यातून आपले हॉटेल विश्व निर्माण करणारे हॉटेल मालक यशवंत हरेर, ग्रामीण भागातून येऊनही महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात झळकणारे साहित्यिक, आगरी सामाजिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे आणि महाराष्ट्र पातळीवर आपल्या संघटन कौशल्यामुळे सुप्रसिद्ध असलेले मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचे अध्यक्ष, पत्रकार प्रकाश नागू म्हात्रे या दोघांना कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्याच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचाही विशेष सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार मॉर्निंग वॉक ग्रुपचे कार्याध्यक्ष मोहन मंचुके, सचिव जी.सी.पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील आदी पदाधिकारी, सदस्यांनी स्वीकारला. या पुरस्कार वितरण समारंभासाठी लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष, उद्योजक नितीन अधिकारी, नायब तहसीलदार, विभागीय आयुक्त कार्यालय कोकणचे श्रीकांत कवळे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, नाट्य-चित्रपट अभिनेते, साहित्यिक शरद कोरडे, पत्रकार-साहित्यिक उमाजी केळुसकर, योगिता केळुसकर, आरती डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version