| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी असणाऱ्या स्मशानभूमीत मठाचा गवंड येथे एकाच ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविण्यात आली असून, त्यामुळे ग्रामस्थांची मोठी सोयच झाली आहे. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 87,77,470/- रुपये अंदाजपत्रकीय खर्चाच्या या गॅस शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते दि.16 जुलै, 2022 रोजी झाला होता. परंतु, या स्मशानभूमीची सध्या काहीशी दुर्दशा झाली आहे.
दक्षिणेकडील संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. तसेच, स्मशानभूमीच्या आतील बाजूस असणारे सुरुचे एक मोठे झाड पूर्णपणे सुकून गेले आहे. जोरदार वाऱ्याने हे झाड पडल्यास बाजूच्या संरक्षक भिंतीचे मोठेच नुकसान होईल. या स्मशानभूमीच्या आवारात नळाच्या किंवा अन्य पाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे शेजारच्या एखाद्या नागरिकाकडून पाणी आणावे लागते. या स्मशानभूमीच्या समोर लोकांना बसण्यासाठी असलेली कौलारू शेडही मोडकळीस आलेली असल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. तरी, याकडे श्रीवर्धन नगरपरिषदेने लक्ष घालून तेथील उणीवा दूर कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.