| चणेरा | प्रतिनिधी |
जानेवारी 2022 मध्ये भूमीपूजन झालेल्या रोहा-नागोठणे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेली अडीच वर्षे अत्यंत मंदगतीने सुरू आहे. आता पावसाने चांगलाच जोर धरला असून, उड्डाणपुलाच्या ठिकाणी ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यांतून दुचाकीधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
या रस्त्यावर खड्ड्यात पडून दररोज अनेक अपघात होत आहेत. वाहनधारकांना तसेच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती द्यावी आणि पर्यायी मार्गाचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांच्या वतीने होत आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा ठेकेदार मे.आर.के. मधानी व एमआरआयडीसीचे अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षांपासून पूर्ण झाले नाही. सलग तिसर्या पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीचा रस्ता अरुंद वळणाचा आणि खाचखळग्यांचा झाला आहे. इथे होणार्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. कामाची प्रगती कासवगतीने चालू असून, नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी मार्गाची दुरवस्था
