उद्योजिका रेश्मा शिंदेंनी व्यक्त केली खंत
| माथेरान | वार्ताहर |
ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या बैरामजी जिजीभाई या नगरपरिषदेच्या दवाखान्यात अत्यावश्यक सोयीसुविधांचा अभाव, त्याचप्रमाणे एकंदरीतच या रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. याबाबत माथेरानच्या सुपुत्री तथा महाबळेश्वर येथे स्थित असलेल्या उद्योजिका रेश्मा विनोद शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे.
या दवाखान्यात रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. पाण्याची समस्या, मळलेले बेडशीट, डाग पडलेल्या उशा, गंजलेली औषधांची कपाटे, कचऱ्याने माखलेले पंखे, विजेची बटणे तुटलेली, त्यामुळे शॉक लागून अपघात होण्याची दाट शक्यता, दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. संपूर्ण दवाखान्याच्या भिंतीवर धूळ साचलेली आहे, रुग्णाला बाथरूममध्ये नेल्यास हँडवॉश करण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, या सर्व गोष्टींची कमतरता प्रकर्षाने जाणवते. दवाखान्यात अत्यावश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देत आहेत की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी आजवर याकडे दुर्लक्ष का केले आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. सर्वसामान्य लोकांना सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकमेव असणाऱ्या या दवाखान्यात समस्यांचा खच पडला आहे. रेश्मा शिंदे यांचे काका याच दवाखान्यात उपचार घेत आहेत, त्यांना पाहण्यासाठी त्या इथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली खंत व्यक्त करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.