खरेदीसाठी रस्त्यालगत गर्दी; पनवेल-मुंब्रा मार्गावर वाहनांच्या रांगा
| खारघर | वार्ताहर |
पनवेल-मुंब्रा मार्गावर तळोजा गाव येथे रस्त्यालगत अनधिकृतपणे भरणार्या मच्छीमार्केटमुळे वाहनचालकांची कोंडी होत आहे. शनिवारी-रविवारी तर इथे एक किलोमीटरच्या आसपास वाहनांच्या रांगा लागतात.
मुंब्र्याकडून पनवेलकडे जाणार्या रस्त्यावर ठाणे, कल्याण आदी भागातील वाहने तळोजामार्गे पनवेल, पुणे आणि कोकण परिसरात जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. स्वस्त दरात मच्छी मिळत असल्याने खारघर, तळोजा परिसरातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. काही जण रस्त्यालगतच मच्छी विक्री करतात.
तसेच रस्त्यालगत हातगाडी लावून फळांची विक्री सुरू असते. या भागात रस्त्यालगत नागरिकांची प्रचंड रहदारी वाढत असल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते. तळोजा गाव ते पापडीचा पाडा गाव भागात मोठी वाहतूक कोंडी असते. तळोजा वाहतूक पोलिस आणि पनवेल महानगरपालिका डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तळोजा वाहतूक शाखेचे अधिकारी सुनील कदम यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.