गणेशभक्तांची प्रवासात कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या 5 कि.मी. रांगा; गणेशोत्सवापूर्वीच बसला फटका

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच गणेशोत्सवाला दोन दिवस बाकी राहिले असताना शनिवार, रविवार सुट्ट्या आल्यामुळे कोकणात गणेशभक्तांची पावले आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी वळली आहेत. त्यामुळे दि. 16 सप्टेंबर सकाळी दहा वाजल्यापासून मुंबई बाजूकडून माणगावकडे मुंबई-गोवा महामार्गावर 5 कि.मी.च्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न यंदाही कायमच आहे. त्यामुळे या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला.

माणगावात शनिवारी सकाळपासूनच महामार्गावर जवळपास 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी माणगावमधील जिल्हा वाहतूक शाखा व माणगाव पोलीसांची पुरती दमछाक झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. चौपदरीकरणाचे काम सुरु असून, माणगावजवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. इंदापूर व माणगाव येथील बायपास मार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडी ही नित्याचीच होणार आहे. यंदाचे वर्षी वाहतूक कोंडी होऊ नये व गणेशभक्तांना आपल्या गणरायाच्या दर्शनाला वेळेत पोहोचता यावे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाच्या रस्त्याची पाहणी केली होती. मात्र, गणेशोत्सवाला काही तास बाकी असताना महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न प्रवाशांना अनुभवायला मिळाले. हौशी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे कोलाड नाक्यावर काही वेळ वाहतूक कोंडी होत असून, पोलीस आणि स्वयंसेवकांकडून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Exit mobile version