55 पैकी 29 ग्रामपंचायतींवर महिलाराज
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींमध्ये 2025-30 या कालावधीत थेट सरपंच यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत करण्यात आली. या सोडतीत आरक्षण निश्चित केले जात असताना अनेक ग्रामस्थांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने गदारोळ सुरू झाला. त्यामुळे शेवटी पोलीस बंदोबस्त मागवून घेतल्यावर ही प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. मात्र, या आरक्षण सोडती विरुद्ध तब्बल 13 ग्रामस्थांनी तक्रारी लेखी स्वरूपात नोंद केल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 29 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच यांच्यासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाने सोडत कार्यक्रम आयोजित केला होता. कर्जत येथील प्रशासकीय भवन मध्ये आयोजित केलेली आरक्षण सोडत तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाल्याने प्रचंड उष्णता असल्याने तालुक्याच्या कानाकोपर्यातून आलेले ग्रामस्थ संतप्त झाले होते. तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी आरक्षण सोडतबाबत निवडणूक आयोगाने घालून दिलेले गाईडलाईन यांची माहिती दिली आणि 2021 मध्ये झालेले आरक्षण सोडत ही बाद ठरविण्यात येत असून यापुढे होणार्या सर्व निवडणुकीसाठी आता आरक्षण काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे 2021 मध्ये थेट सरपंच यांचे आरक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ठिकाणी काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडती काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी दोन तर त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 15 या सोडती निश्चित केल्या.
तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींमधील 22 ग्रामपंचायती या सर्वसाधारण जाहीर करण्यात आल्या असून, अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती आठ, नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ आणि सर्वसाधारण 12 अशा 29 ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली. त्या सोडतीसाठी गौरी दादासो शेटे आणि विश्वराज दादासो शेटे या बालकांनी चिठ्ठ्या उचलल्या. अनुसूचित जमातीमध्ये शेलू, नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये ओलमन आणि सर्वसाधारणमधील तिवरे या तीन ग्रामपंचायतींसाठी केवळ चिठ्ठी काढण्यात आली.
मात्र, 2021 मध्ये काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द करण्यात आल्याने आमच्या ग्रामपंचायतमधील आरक्षण बदलले गेले आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी त्याबाबत आक्षेप घेण्यात सुरुवात केली. परिणामी, कर्जत येथील थेट सरपंच आणि महिला आरक्षण सोडत ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गोंधळाची स्थिती कमी करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील थेट सरपंच आरक्षण
प्रवर्ग.. ग्रामपंचायत.. महिला आरक्षण
अनुसूचित जाती..2 जागापैकी मांडवणे तर कोंदिवडे -महिला
अनुसूचित जमाती.. 16 जागा पैकी महिला आरक्षण..8 आसल,शेलु,कळंब,अंजप, कशेले,बीड बुद्रुक,शिरसे,भालिवडी.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण.. बोरिवली,वैजनाथ,रजपे,पोशीर,वारे, साळोख तर्फे वरेडी, खांडपे,पाषाण.
नागरिकांचा मागास प्रवर्ग ..15 पैकी आठ महिला.. नांदगाव,ओलमन, पाथरज,वरई, हुमगाव,पळसदरी,दामत, गौरकामत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.. सात जिते,अंभेरपाडा,जामरंग,मोग्रज, भिवपुरी, पाली, पिंपलोली
सर्वसाधारण ग्रामपंचायती 22 पैकी 12 महिला सर्वसाधारण..
हालिवली,किरवली,उमरोली, माणगाव तर्फे वरेडी, वाकस, मानिवली,तिवरे,वावलोली, सावेळे,कडाव,सावळे हेदवली, कोल्हारे.
सर्वसाधारण..
चिंचवली,उक्रुळ,नेरळ,ममदापूर,दाहिवली तर्फे वरेडी, वेणगाव,वदप,पोटल,खांडस.