माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रधान सचिवांनी दिली विभागीय प्रदर्शनास भेट

राज्य शासनाची विकास कामे जनतेपर्यंत पोचविण्यात
स्थानिक माध्यमांचा मोठा हातभार

। ठाणे । प्रतिनिधी ।

शासनाच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक दैनिके नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात. लघु व मध्यम दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माहिती व जनसंपर्कच्या राज्यमंत्री अदिती तटकरे हे प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी काढले. कोंकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने ठाण्यातील टाऊन हॉल येथे भरविण्यात आलेल्या दोन वर्षे जनसेवेची या विभागीय प्रदर्शनास कपूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवादही साधला.

सध्या माध्यमांचे स्वरुप बदलत आहे. चोवीस तास माहिती देणारी माध्यमे आल्यामुळे माहिती विभागाचे महत्त्वही वाढत आहे. राज्य शासनाची अधिकृत माहिती या माध्यमामार्फत जनतेपर्यंत पोचविण्यासाठी माहिती विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. जलद व अधिकृत माहिती देण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात येत असून सोशल मिडिया कक्ष आणखी बळकट करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवर घडामोडी शासनापर्यंत पोचविण्यात स्थानिक दैनिकांचे महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून अचूक माहिती व जनतेची मते शासनाला कळतात. त्यामुळे लघु व मध्यम दैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व विभागाच्या राज्यमंत्री आग्रही आहेत. लहानमोठ्या दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक प्रश्‍न आहेत. मात्र, मागील तीन महिन्यात पत्रकारांच्या वैद्यकीय बिलांची कामे तातडीने निकाली काढण्यात आली आहेत. पत्रकारांसाठी आणखी कोणत्या कल्याणकारी योजना आणता येतील यावर विचार सुरू आहे. यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे, अजय जाधव, मनोज सानप, राहूल भालेराव, मिलिंद बल्लाळ, कैलाश म्हापदी, संजय पितळे यांच्यासह स्थानिक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये विभागीय प्रदर्शन भरविण्यात आल्याचा संदर्भ देऊन मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या शासन सेवेतील 31 वर्षाच्या काळात मी इतकी सुंदर व ऐतिहासिक वास्तू पाहिली नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या टाऊन हॉलचे इतक्या उत्तम प्रकारे नुतनीकरण व जतन केल्याचे मी पहिल्यांदाच पाहत आहे. याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी त्यांच्या प्रशासनाचे कौतुक करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दीपक कपूर, प्रधान सचिव
Exit mobile version