बाप अपंग, घर मोडके आणि मुलीचं लग्न…

| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात दरडीखाली अनेक घरे जमीनदोस्त झाली, संसार उद्ध्वस्त झालेत. या दरडीने येथील चव्हाण कुटुंबियांचे आयुष्यच बदलून गेलं आहे. त्यांच्यापुढे आता अनेक प्रश्‍न आहेत. या कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहतोय. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कुटुंबाला आता आर्थिक मदतीची गरज आहे. मुलीच्या लग्नासाठी जमवलेले दागदागिने गेले, आता मुलीच्या लग्नात काय करावं? चव्हाण कुटुंबियांची कैफियत मनाला वेदना देणारी आहे.

काबाडकष्ट करुन, पोटाला चिमटा काढून मोठ्या आशेने कमावलेलं सगळं गेलं. कोणाचं लग्न ठरलं होतं. कोणाच्या मुलाचा वाढदिवस जवळ आला होता. कोणी आपल्या बाळाच्या बारशाची तयारी करत होतं. यात महापुराने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.सुतारवाडीतील चव्हाण कुटुंबाने मुलीच्या लग्नासाठी दागदागिने केले होते. दरड व महापुराच्या संकटात आपल्या झोपडीत काहीच शिल्लक राहणार नाही, याची खात्री असल्याने चव्हाण कुटुंबाने एका सुताराच्या घरी दागिने ठेवण्यास दिले. मात्र, ते घर पूर्ण दरडीखाली आलं अन् सारे संपून गेलं. बाप अपंग असल्याने आता पुन्हा हे दागिने कसे जमविणार, मुलीच्या लग्नाचं काय होणार? या विचारांनी अन् अश्रूंनी आईच्या मनात घर केलं आहे. या संकटात पुन्हा उभे राहण्यासाठी कुणी तरी यावं अन् मदतीचा हात द्यावा, या अपेक्षेने ही आई, बाप व मुलगी जगत आहे.

साखर सुतारवाडी या दरडग्रस्त गावात विठ्ठल चव्हाण हे दिव्यांग ग्रामस्थ राहतात. पत्नी सुनिता आणि एक मुलगी पूजा असं त्यांचं छोटसं कुटुंब आहे. घाटकोपर-मुंबई येथे राहून लोकांच्या घरी धुणी-भांडी, मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. तिच्या लग्नासाठी दागदागिने तयार केले. कोरोनाच्या महामारीत मुंबई सोडून गावी परत आलेल्या या कुटुंबाकडे स्वतःचे चांगले घर नव्हते. दरवाजे नसलेल्या पडक्या घरात राहात असताना चव्हाण कुटुंबियांनी आपली आयुष्यभराची कमाई, दागदागिने शेजारी असलेल्या भरत सुतार यांच्याकडे ठेवायला दिली. साखर सुतारवाडी येथील दरडीत भरत सुतार यांचे संपूर्ण घर गेले. आणि, या घरासोबत सुनिता चव्हाण, विठ्ठल चव्हाण यांची आयुष्यभराची पुंजी, मुलगी पूजा हिच्या लग्नासाठी तयार केलेले दागिने वाहून गेले. या धक्क्याने विठ्ठल चव्हाण आजारी पडले असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version