रुग्णालयाच्या कारभाराचा दिव्यांगांना भुर्दंड

प्रमाणपत्र मिळविण्याच्या नोंदणीसाठी दोनशे रुपये खर्च

| पनवेल | वार्ताहर |

अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया रुग्णालयामार्फतच राबविली जाणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता रुग्णालय त्या दिव्यांग व्यक्तींना बाहेरून ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याचा अजब सल्ला देत आहे. सायबर कॅफेत फॉर्म भरण्यासाठी दोनशे रुपये खर्च येत असून, त्याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. ही बाब रायगड शिव आरोग्य सेनेच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारत जनआंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सध्या तात्पुरती व्यवस्था करुन हा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

महाराष्ट्र शासन दिव्यांग मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य करून शासकीय रुग्णालयाने तेथेच रुग्णालयातच ऑनलाईन फॉर्म भरून ते दिव्यांग प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया मोफत राबविणे गरजेचे आहे. परंतु, रुग्णालय आपली जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयाच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे संबंधित दिव्यांग व्यक्तींना दोनशे रुपये नाहक भुर्दंड सोसून बाहेरून ऑनलाइन फॉर्म भरावे लागत आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. परेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकार्‍यांनी अलिबाग शासकीय रुग्णालयाला या प्रकाराबद्दल जाब विचारण्यासाठी धडक दिली. यावेळी शिव आरोग्य सेनेचे अलिबाग तालुका संघटक साक्षात म्हात्रे, खारघर शहर संपर्क समन्वयक सचिन सावंत, करंजाडे शहर संघटक सुनील पवार, खारघर सहविभाग संघटक रोशन शिंदे, चौलमळा येथील अनिकेत नाईक, सार्थक घरत, ओमकार पाटील व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयातील सर्व ओपीडी आणि इतर विभाग देत असलेल्या सुविधांबद्दल पाहणी करण्यात आली. दरम्यान, जीवनावश्यक औषधांचा तुटवडा, स्वच्छतागृहांची अस्वच्छता, स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा अभाव आदी बाबी निदर्शनास आल्या. त्याचप्रमाणे डॉक्टरही वेळेवर येत नसल्याचे तेथील रुग्णांनी सांगितले. ऑन ड्युटी त्यांच्या जागेवर नसल्याचे आढळून आले, असे विविध समस्या रुग्णालयात असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांची भेट घेत या सर्व प्रकाराबद्दल त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी पुरेसे मनुष्यबळ नाही, कॉम्प्युटर नाही, त्यामुळे रुग्णालयातच नोंदणी करता येत नाही, असे न पटणारे, बेजबाबदारपणाचे उत्तर दिल्याचे आरोग्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. जर या समस्या तात्काळ सोडविण्यात आल्या नाहीत, तर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिव आरोग्य सेनेच्या वतीने देण्यात आला. वरील सर्व बाबी गंभीर असून, खास करून दिव्यांगाचा विषय याबाबत आपले वरिष्ठ आरोग्य अधिकारी ठाणे जिल्हा यांना लवकरच शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी भेटून या प्रकाराबाबत जाब विचारला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, आम्ही तात्पुरतं आमच्या पद्धतीने मार्ग काढत दिव्यांग व्यक्तींना रुग्णालयातच फॉर्म भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी सुरुवात करू आणि त्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्‍वासन डॉ. शीतल जोशी यांनी शिव आरोग्य सेनेला दिले.

Exit mobile version