मोफत दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 103 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे भारत विकास परिषद संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे ट्रस्ट नव भारत विकास फाउंडेशन यांच्या वतीने मोफत दिव्यांग शिबीर आयोजित करण्यात येते. या शिबिराला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसादात मिळत आहे. माणगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या या शिबिरात कृत्रिम मॉड्युलर पाय, हात तसेच कॅलिपर बसविण्यासाठी दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करून अचूक मोजमाप घेण्यात आले. या शिबिराचा एकूण 103 दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून, पुढील टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना आधुनिक कृत्रिम पाय व हात मोफत बसविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे, भारत विकास परिषद तसेच माणगाव तालुक्यातील स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ पुणेचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आर्या पवार यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिव्यांग व वृद्धत्व केंद्राचे प्रमुख विनय खुटवळकर (पुणे) यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना आधुनिक कृत्रिम अवयवांच्या तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली. या अत्याधुनिक साधनांमुळे दिव्यांग व्यक्तींना चालणे-फिरणे, दैनंदिन कामे करणे आणि स्वावलंबी जीवन जगणे अधिक सुलभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून आलेल्या सुमारे 103 दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवी उमेद निर्माण झाली असून त्यांना हक्काची गती आणि शक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिव्यांगांच्या जीवनात आत्मनिर्भरता व आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
भारत विकास परिषद संचलित पुणे येथील दिव्यांग केंद्र गेली 25 वर्षे दिव्यांग सेवेत कार्यरत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोफत शिबिरे आयोजित करून गरजू दिव्यांगांना कृत्रिम हात – पाय बसवून देत आहे. विशेष म्हणजे या संस्थेला कोणतेही सरकारी अनुदान मिळत नसून समाजाच्या सहभागातून हे कार्य सातत्याने सुरू आहे. या संस्थेमार्फत सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे आधुनिक कृत्रिम हात पाय गरजू लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत देण्यात येतात.
नवजीवनाची संधी
महाराष्ट्रात हात-पाय गमावलेल्या दिव्यांगांची संख्या एक लाखांहून अधिक असण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. पुढील पाच वर्षांत ‘दिव्यांग मुक्त महाराष्ट्र’ घडविण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले असून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. माणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना नवजीवनाची संधी मिळाली असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






