| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याच्या पूर्व भागात चिरनेर, कळंबुसरेसह अनेक गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आयडीया, एअरटेल, जिओ कार्डचे अनेक ग्राहक आहेत. मात्र, या ग्राहकांना मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारक नागरीक हैराण झाले आहेत.
उरण पूर्व भाग हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, याच ग्रामीण भागात अनेक उच्च शिक्षित नागरिक, विद्यार्थी वास्तव्य करीत आहेत. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग-धंदे निर्माण होत असल्याने कामगार वर्गाची वस्ती वाढत आहे. या मधिल अनेक नागरीक, कामगारांकडे आयडीया, जिओ, एयरटेल कंपन्यांचे मोबाईल कार्ड आहेत. तसेच, ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकही या फोन कार्डचा वापर करीत आहेत. मात्र, अनेक वेळा इमर्जन्सी असतानाही फोन, मोबाईल लागत नाही. तसेच, आयडीया, एअरटेल जिओ मोबाईल फोनला नेटवर्क कमी प्रमाणात मिळत आहे. लाईट गेल्यानंतर तर संपूर्ण नेटवर्कच गायब असते. यामुळे मोबाईल धारक ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मोबाईल कार्ड कंपन्यांनी ग्राहकांच्या समस्या संदर्भात लक्ष वेधून ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी मोबाईल फोन धारक करीत आहेत.