| पनवेल । वार्ताहर ।
शहर विकसित करताना सिडकोने उद्यान आणि मैदानांसाठीची जागा राखीव ठेवली आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर ही उद्याने सिडकोने पालिकेकडे हस्तांतर केली आहेत, पण या उद्यानांची देखभाल ठेवण्याची जबाबदारी सिडकोची असल्याची कारणे पालिका देत असल्याने दोन प्राधिकरणांमधील टोलवाटोलवीमुळे उद्यानांची दुरवस्था झाली आहे.
खारघर शहर वसवताना सिडकोने सेक्टरनिहाय उद्यानांची निर्मिती केली आहे. सद्यस्थितीत पालिकेकडून एजन्सीमार्फत सिडको उद्यानांमधील किरकोळ कामे केली जातील, असे सांगण्यात आले. मात्र सिडको आणि पालिका यांच्यात असमन्वयामुळे उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सेक्टर पस्तीस तसेच लिटिल वर्ल्ड मॉल शेजारील उद्यानात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे; तर सेक्टर सात वर्दळीचा परिसर आहे. या उद्यानात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. शिवाय सकाळ व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांची, तर संध्याकाळी लहान मुलांचा वावर असताना अतिशय सुंदर अशा या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. अशाच प्रकारची अवस्था शहरातील इतर उद्यानांची झाली आहे. या उद्यानाची दररोज साफसफाई होत नसून लहान मुलांसाठी असलेले झोपाळे, घसरगुंडी व इतर खेळण्यांचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सिडको आणि पालिकेच्या वादात उद्यानांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
सिडकोकडून मोजकीच उद्याने पालिकेकडे हस्तांतरित झाली आहेत. पालिकेकडून उद्यानात देखरेख केली जात आहे. मात्र, इतर उद्यानांची कामे सिडको करणार आहे.
राजेश कर्डिले
उद्यान अधिकारी, पनवेल महापालिका