युनियन बँकेचा गलथान कारभार

माथेरान व्यापार्‍यांचा उपोषणाचा इशारा
माथेरान । वार्ताहर ।
अनेक वर्षांपासून कार्यरत असणारी येथील एकमेव नॅशनलाईज युनियन बँकेच्या काही वर्षांपासून अनियमित सेवे, एटीएममध्ये पैसे नसणे, नेटवर्किंगचा त्रास त्याचप्रमाणे ग्राहकांना अपेक्षित कामे पूर्ण केली जात नाहीत. या बँकेच्या अनागोंदीपणामुळे व्यापारी वर्गाला सर्वाधिक फटका बसत आहे. कोरोना काळानंतर नुकताच हे पर्यटनस्थळ सुरू करण्यात आल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु येणार्‍या पर्यटकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत.त्यामुळे पर्यटकांना तसेच व्यापारी वर्ग मोलमजुरी करणारे यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या अनेक कालावधीपासून युनियन बँक ऑफ इंडिया माथेरान शाखेच्या गलथान कारभाराविरोधात माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशन तर्फे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये व्यापारी बंधू आणि नागरिकांना बँकेच्या कामाकरिता होत असलेला त्रास दूर नाही केला तर येत्या मंगळवारी (दि.26) बँकेच्या विरोधात श्रीराम मंदिर चौक माथेरान येथे उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे पत्र माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौधरी यांच्या वतीने देण्यात आले. दिवाळी पर्यटन हंगामापूर्वी येथील बँकेचे कामकाज सुरळीत व्हावे व ग्राहकांना होणारी गैरसोय दूर करावी असेही सांगण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष राजेश चौधरी, भाजपचे विद्यमान गरसेवक चंद्रकांत जाधव, कुलदीप जाधव, प्रतिक ठक्कर, तुकाराम भोसले, विकी कदम ,निसार महापुळे आदी व्यापारी बंधू उपस्थित होते .

Exit mobile version