मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीत
चारही जोडया अपयशी
टोक्यो | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मंगळवारी पिस्तूल आणि रायफल प्रकाराच्या मिश्र स्पर्धामध्ये अपेक्षाभंग करीत भारताच्या चारही जोडयांनी पात्रता फेरीचा अडथळाही ओलांडला नाही.
भारताला पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा असलेल्या सौरभ चौधरी आणि मनू भाकर जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दडपणाखाली खेळ करीत पात्रता फेरीतच गाशा गुंडाळला. असाका नेमबाजी केंद्रावर झालेल्या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात 582 गुण मिळवत अव्वल ठरलेल्या सौरभ-मनू जोडीला दुसर्या पात्रता टप्प्यात सातवे स्थान मिळाले. पात्रतेच्या दुसर्या टप्प्यात सौरभ-मनू जोडीने प्रत्येकी दोन मालिकांमध्ये एकूण 380 गुण मिळवले. या फेरीत मनूने खराब सुरुवात करताना पहिल्या मालिकेत 92 आणि दुसर्या मालिकेत 94 गुण कमावले. पण सौरभने पहिल्या मालिकेत 96 आणि दुसर्या मालिकेत 98 गुण प्राप्त करीत एकूण गुण वाढवण्याचा प्रयत्न केला.
या स्पर्धा प्रकारात सहभागी झालेल्या अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंह देस्वाल या आणखी एका भारतीय जोडीला पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात 564 गुण मिळाले. त्यामुळे 17व्या स्थानासह त्यांची वाटचाल खंडित झाली.
त्यानंतर, 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात भारताच्या दोन्ही जोडया पहिल्या पात्रता टप्प्यातच पराभूत झाल्या. ईलाव्हेनिल व्हालारिव्हान आणि दिव्यांश सिंह पन्वार यांनी प्रत्येकी तीन मालिकांनंतर 626.5 गुण मिळवत 12वा क्रमांक मिळवला. तर अंजूम मुदगिल आणि दीपक कुमार जोडीने 6.23.8 गुणांसह 18वा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत 29 जोडया सहभागी झाल्या होत्या.