| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या घटनांची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला चौकशी अहवाल गुंडाळला गेला आहे. केवळ फार्स करुन सरकारने वेळ मारुन नेल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
किल्ले रायगडावर ओमकार दिपक भिसे, प्रशांत गुंड, दोन तरुणांच्या मृत्यू झाला. या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.या घटनेला दोन महिने होऊन गेले तरी देखील अहवाल सादर करण्यात आला नाही अशी माहिती महाड प्रांत अधिकारी यांनी दिली. महाड येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल तातडीने पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश 4 जून रोजी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे दिले होते. परंतु अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही.
प्रांताधिकारी म्हणून तत्कालीन प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड या होत्या त्यानंतर त्यांची बदली झाली व त्यांच्या बदलीने नव्याने नियुक्त झालेले प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी पदभार स्वीकारला. मात्र रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड प्रांताधिकारी यांना दिलेल्या निर्देशामध्ये प्रांताधिकारी यांनी घडलेल्या घटनेची चौकशी करणे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे. सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे.सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत सविस्तर चौकशी करणे. घटनेचा चौकशी अहवाल आपल्या सादर करणे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या.
मयत ओंकार भिसे आणि प्रशांत गुंड यांच्या नातेवाईकांनी वरील घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले असताना अद्याप चौकशी अहवाल शासनाला सादर करण्यात आला नसल्याने मृतांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे