सरपंच, ग्रामसेवक, तलाठींना आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा शिबिर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत तसेच पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास तहसिलदार मिनल दळवी, रायगड भूषण आपत्ती तज्ज्ञ जयपाल पाटील, अनिकेत पाटील, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि ओडिसा येथे प्रशिक्षण घेऊन आलेले सहायक गटविकास अधिकारी कैलास चौलकर, यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. यावेळी तहसिलदार मीनल दळवी, नायब तहसिलदार अजित टोळकर आदीं उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार आपत्ती तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी दैनंदिन जिवनातील आपत्तींबाबत आपल्या शैलीत माहिती दिली. ते म्हणाले की, आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहून येणार्‍या आपत्तीचा सामना धिराने करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक आहे. आपत्तीत संकटग्रस्तांना मदत करणे आपले कर्त्यव आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी देखील प्रत्येकाने आपापला सहभाग देणे आवश्यक आहे. यासाठी घरी येणार्‍या पाहुण्यांना आवश्यकता नसेल तर अर्धा ग्लासच पाणी द्या. गाडया धुताना थेट पाईपाच्या वापराऐवजी दोन बालद्यांमध्ये पाणी घेऊन त्याने गाडी धुतल्यास पाण्याची नासाडी देखील टाळली जाईल आणि शरिराचा व्यायाम देखील होईल. तर आपत्ती तज्ज्ञ अनिकेत पाटील यांनी प्रात्यक्षिक दाखवून आपत्तीमध्ये कशा प्रकारे सामना करायचा, आग प्रतिरोधक यंत्राचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी देखील आपत्ती संदर्भातील माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच ओडिसा येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले सहायक गटविकास अधिकारी कैलास चौलकर यांनी आपले अनुभव सांगून आपत्ती हाताळण्यासंदर्भातले मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थिती नोंदवली, तसेच कार्यक्रमाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमात अचानक उद्भवणार्‍या आपत्तींमध्ये कोणती दक्षता घ्यावी तसेच यंत्रणेला कसे सहकार्य करावे यावर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version